
स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देश उभा करताना गरीब, सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवले. मात्र, आज मोदी सरकारने पंडित नेहरूंनी उभ्या केलेल्या सार्वजनिक मालमत्ता विकून खासगीकरणाकडे वाटचाल सुरू ठेवल्याची टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.
वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे क्रांतिवीर देशभक्त दादा आप्पाजी बर्डे गुरुजी यांचा 39वा स्मृतिदिन व अर्धपुतळा अनावरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार मानसिंगराव नाईक होते. मंत्री पाटील म्हणाले, काँग्रेसच्या काळात जे सार्वजनिक क्षेत्रात प्रकल्प उभे राहिले, ते चार-पाच लोकांना विकून त्यातून येणाऱ्या पैशांवर देश चालविता येईल, अशी मोदी सरकारची भावना आहे. संसदेची इमारत आपल्याला अभिमानस्पद आहे; परंतु ती इमारत एक म्युझियम करून नवीन संसद भवन बांधण्याचा घाट मोदी सरकारने चालविला आहे. सध्याचे राज्यकर्ते स्वतःला अग्रस्थानी ठेवून नवा इतिहास लिहिण्यासाठी प्रयत्नशील असून, अमेरिका, युरोपधार्जिण्या, तसेच देशातील मूठभर धनिकांना मोठे करण्याचा उद्योग करीत आहेत. यातून देशाला स्वातंत्र्य मिळविण्याच्या हेतूला तिलांजली दिली जात आहे. काँग्रेसच्या काळातील कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेची आठवण या सरकारच्या काळात राहू द्यायची नाही, अशीच मानसिकता मोदी सरकारची आहे, असेही ते म्हणाले.
जुलमी इंग्रजी राजवट सामान्य माणसांना नकोशी होती. स्वातंत्र्यसैनिकांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून सामान्यांना अभिप्रेत समाजव्यवस्था निर्माण केली. सध्या हयात असणारे स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या वारसांना एकत्र करून धुळे खजिना लूट, बिळाशी सत्याग्रह या घटनांचे लिखाण करावे लागेल, असेही मंत्री पाटील म्हणाले. आमदार नाईक म्हणाले, आपल्या परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान मोठे आहे. बर्डे गुरुजी हे स्वातंत्र्य चळवळीच्या अग्रभागी होते. आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना शिराळा येथे भव्य राज्यव्यापी स्मारक उभे करण्यास जागा उपलब्ध करून देऊ.


























































