
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यामुळे जनजीवन सुरळीत सुरू झाले असून त्याचा परिणाम मुंबईतील मालमत्ता नोंदणी वाढीत झाला आहे. गेल्या वर्षी मुद्रांक शुल्काच्या दरात सवलत देऊनही नोंदणीत वाढ झाली नव्हती. मात्र, या वर्षी मुद्रांक शुल्काचे दर सामान्य असतानाही ऑक्टोबर महिन्यात 8 हजार 500 हून जास्त मालमत्तांची नोंदणी झाली आहे.
मुद्रांक शुल्काचे दर सामान्य असतानादेखील ऑक्टोबरमधील कामगिरी वर्षभरापूर्वीच्या कालावधीत दिसलेल्या नोंदणी आकडय़ापेक्षाही पुढे गेली आहे. गेल्या वर्षी मुद्रांक शुल्क सवलतीच्या कालावधीत 7 हजार 928 मालमत्तांची नोंदणी झाली होती. सध्याच्या सणासुदीच्या काळात विक्री आणि लॉन्च या दोन्हींचा वेग सुधारला आहे आणि दिवाळीतही हा ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा आहे, असे मुंबईतील विकासकांना वाटते. दरम्यान, काही विकासकांनी सणासुदीच्या मुहूर्तावर त्यांचे नवीन प्रकल्प लॉन्च केले आहेत. अनेक जण आकर्षक किमती आणि फ्लेक्सी-पेमेंट प्लॅन ऑफर करत आहेत. यामुळे विक्रीला चालना मिळाली आहे. कमी गृहकर्जाच्या व्याजदरामुळे गृहखरेदी करणाऱयांमध्ये वाढ झाली आहे. सध्याच्या सणासुदीच्या हंगामामुळे पुढेही मागणी सुरू राहण्याची अपेक्षा आहे, असे अध्यक्ष नरेडको महाराष्ट्र आणि रुणवाल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संदीप रुणवाल यांनी सांगितले.
‘ओबेरॉय’ने गोरेगावात 787 कोटींचे फ्लॅट विकले!
मुंबईत कोरोना नियंत्रणात आल्यानंतर आता बांधकाम क्षेत्रालाही चांगले दिवस आले असून ओबेरॉय रिआलिटीने नुकत्याच बांधलेल्या रहिवासी संपुलात सुमारे 787 कोटींचे फ्लॅट विकले गेले आहेत.
गोरेगावमधील ओबेरॉय गार्डन हा प्रकल्प 80 एकर जागेवर उभा राहिलेला आहे. येथे उभारण्यात आलेल्या रहिवासी गृह संकुलातील टॉवरमधील अनेक फ्लॅटस् बुक झाले आहेत. नव्या गृह प्रकल्पात 3.90 लाख चौरस फुटांच्या जागेसाठी तब्बल 787 कोटींचे फ्लॅट बुक झाले. दरम्यान, 1 जानेवारी 2021 ते आतापर्यंत सुमारे 2 हजार 705 कोटी रुपयांच्या फ्लॅटचे बुकिंग झाले आहे.


























































