नागरिकता सुधारणा विधेयकावरून संयुक्त जनता दलात मतभेद

435

लोकसभेत सोमवारी सादर करण्यात आलेल्या नागरिकता सुधारणा विधेयकाला संयुक्त जनता दलाने पाठिंबा दिला होता. मात्र, विधेयकाला पाठिंबा देण्यावरून पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या विधेयकावरून पक्षातच विरोधाचे सूर उमटत आहेत. पक्षाचे उपाध्यक्ष आणि पक्षाचे निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांनी विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय निराशाजनक असल्याचे म्हटले आहे.

प्रशांत किशोर यांनी ट्विट करून विधेयकाला पाठिंबा देण्याच्या पक्षाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या विधेयकात धर्माच्या आधारावर नागरिकता देण्यात येत आहे. हे विधेयक भेदभाव निर्माण करणारे असल्याचे नमूद करत त्यांनी विधेयकाला पाठिंबा देण्याचा पक्षाचा निर्णय निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. या विधेयाकाला पाठिंबा देणे हे पक्षाच्या संविधानाविरोधात असल्याचेही किशोर यांनी म्हटले आहे. पक्षाच्या संविधानात पहिल्या पानावरच धर्मनिरपेक्षता हा शब्द तीनवेळा लिहिला आहे. प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या या निर्णयावरून पक्षाचे अध्यक्ष नीतीश कुमार यांच्यावरही टीका केली आहे. पक्षातील नेतृत्वाच्या विचारधारेशी पक्षाचा हा निर्णय मेळ खात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्ष महात्मा गांधी यांच्या विचारधारेपासून प्रेरीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या विधेयकाविरोधात पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी जंतर मंतरवर निदर्शने केली. आंदोलकांनी विधेयकाची प्रत फाडली आणि पक्ष कार्यालयातही तोडफोड केली. मुख्यमंत्री नीतीशकुमार धोकेबाज असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. पक्षाने मुस्लीमांची मते मिळवली. मात्र, या समुदायाला पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी विधेयकाला पाठिंबा देत समुदायाला धोका दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या