
उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. छेडछाडीला विरोध करणाऱ्या विद्यार्थिनीला आरोपींनी जिवंत जाळले आहे. मुलीला वाचवण्यासाठी आलेले मुलीचे वडिलही आगीत होरपळले आहेत. आगीत जळालेल्या विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून तिला पुढील उपचारासाठी वाराणसीला पाठवले आहे. तर तिच्या वडिलांवरही उपचार सुरू आहेत.
बलिया जिल्ह्यातील नगवा गावात शनिवारी ही घटना घडली आहे. गावातील एक मुलगी शिकवणीसाठी जात असताना गावातील तरुण तिची छेड काढत होता. विद्यार्थिनीने छेडाछाडीला विरोध केला. विद्यार्थिनीच्या विरोधामुळे संतप्त झालेल्या तरुण शनिवारी थेट मुलीच्या घरात शिरला. त्याने मुलीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यावर तिचे वडील तिला वाचवण्यासाठी आले. मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात तेही होरपळून ते भाजले आहेत.
गावात राहणारा एक तरुण विद्यार्थिनीला नेहमी त्रास देत होता. ती शिकवणीला जात असताना तो तिचा पाठलाग करत होता. आपण सांगू तसे वाग, मी सांगितले तसे केले नाही, तर तुझे आयुष्य बरबाद करीन, अशी धमकीही तो तिला देत होता. त्याने तिची छेड काढली असता, तिने त्याचा विरोध केला. त्यानंतर त्याने शनिवारी विद्यार्थिनीला जिवंत जाळले आहे, अशी माहिती मुलीच्या कटुंबीयांनी दिली.
या आगीत होरपळलेल्या विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून तिला पुढील उपचारासाठी वाराणसीला पाठवण्यात आले आहे. विद्यार्थिनी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस गावत दाखल झाले. आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बलिया शेजारील देवरिया जिल्ह्यात मुलीच्या छेडछाडीबाबतची तक्रार दाखल केल्यावर मुलीच्या वडिलांना आरोपींनी मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच बलियामध्ये छेडछाडीचा विरोध करणाऱ्या मुलीला जिवंत जाळण्यात आले आहे. या घटनांमुळे उत्तर प्रदेशमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच कायदा- सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.






















































