
पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) ही स्पर्धा सुरू असून सोमवारी लाहोर करंदर आणि क्वेटा ग्लेडियेटर्स यांच्यात सामना खेळला गेला. शेवटपर्यंत रोमहर्षक झालेल्या या लढतीत 400 हून अधिक धावांची आतषबाजी झाली. चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह हा सामना आणखी एका गोष्टीसाठी क्रीडाप्रेमींच्या लक्षात राहिला. या लढतीत सासरे-जावई आमनेसामने आले होते.
लाहोर करंदरचा कर्णधार शाहिन शाह आफ्रिदी होता, तर क्वेटाकडून पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी मैदानात उतरला होता. या लढतीत हे सासरे-जावई फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये विशेष कामगिरी करू शकले नाहीत, मात्र यामुळे क्रीडा चाहत्यांचे मात्र मनोरंजन झाले.
स्कोरकार्ड
प्रथम फलंदाजी करताना लाहोर करंदरने 204 धावा चोपल्या. फखर जमानने सर्वाधिक 70 धावांचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या क्वेटा ग्लेडियेटर्सने जशास तसे उत्तर दिले. क्वेटाकडून सलामीवीर खेळाडू जेसन रॉय याने धमाकेदार शतक केले. रॉयने 57 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांची आतषबाजी करत 116 धावा चोपल्या. रॉयसह जेम्स विन्स याने नाबाद 49 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
सासरे-जावयाची कामगिरी
या लढतीत शाहिन आणि शाहिद आफ्रिदी या दोघांचीही कामगिरी काही खास राहिली नाही. दोघांनाही गोलंदाजीमध्ये विकेट मिळाली नाही. शाहिद आफ्रिदीने तीन षटकात 25 धावा दिल्या, यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. तर दुसरीकडे शाहिन शाह आफ्रिदीने याने 4 षटकांमध्ये 40 धावा दिल्या आणि त्यालाही एकही विकेट मिळाली नाही. मात्र त्याने एक शानदार कॅच घेतला. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी शाहिद आफ्रिदीने असाच कॅच घेतला होता.
Remember when this happened? 🤯
It’s Lala vs Shaheen today. #HBLPSL7 l #LevelHai l #QGvLQ pic.twitter.com/tPv4f1gurL— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 7, 2022
मोठ्या मुलीशी सूत जुळले
दरम्यान, शाहिद आफ्रिदी याची मोठी मुलगी अक्सा हिच्याशी शाहिन शाह आफ्रिदी याचे सूत जुळले असून गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडाही पार पडला. लवकरच दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
Blessing your feed with the Afridi hair flip. #HBLPSL7 l #LevelHai l #QGvLQ pic.twitter.com/08FdPIPb1a
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 7, 2022

























































