डाळींच्या किमती कडाडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, धुळे

किमतीत सरासरी 20 टक्के वाढ

पाऊस लांबल्यामुळे त्याचा परिणाम महागाईवर झाला आहे. तुरडाळीच्या किमतीत 25 टक्के तर इतर डाळींच्या किमतीत सरासरी 20 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे डाळींच्या किमती कडाडल्या आहेत. सर्वसामान्य ग्राहकाला आता एक किलो तुरडाळ घेण्यासाठी 90 ते 100 रुपये मोजावे लागत आहेत तर मठ, मूग, हरभरा या डाळींसाठी सरासरी 80 रुपये एका किलोसाठी मोजावे लागत आहेत. यंदा पाऊस लांबल्यास डाळींच्या दरात अजून वाढ होईल, असे डाळी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

यंदा मृग नक्षत्र दोन दिवसांवर आले तरीदेखील पावसाची चिन्हे दिसत नाहीत. एरव्ही 20 मे ते 6 जून या काळात वळवाचा पाऊस होतो. मृग नक्षत्राच्या काही दिवस अगोदर बेमोसमी पावसाची हजेरी लागते. हा पाऊस डाळी आणि इतर कडधान्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. परंतु यंदा मृग नक्षत्र आले तरी पावसाची चिन्हे दिसत नाहीत. हंगामी पाऊस लांबत असल्याचे स्पष्ट होताच बाजारावर त्याचे परिणाम होऊ लागले आहेत. कडधान्याच्या उत्पन्नात घट होणार असल्याने बाजारात दरवाढ झाली आहे. तूरडाळीच्या दरात सरासरी 25 टक्के तर मठ, मूग, हरभरा आणि इतर डाळींमागे किलोमागे सरासरी 20 टक्के वाढ झाली आहे. साहजिकच सामान्य ग्राहकाला एक किलो तुरडाळ घेण्यासाठी 80 ते 100 रुपये मोजावे लागत आहेत. पावसाने विलंब केला तर येणाऱया काळात डाळींचे दर अजून वाढू शकतात असे विजय अग्रवाल या व्यावसायिकाने सांगितले. शासनाने जीवनावश्यक असणाऱया डाळींचे दर नियंत्रित आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त होत आहे.