
भांडणात मध्यस्थी करणार्यानेच वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर झालेल्या वादातून गोळीबार केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जखमी झालेल्याने खंडणी मागितल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याच्यासह साथीदारावर खंडणी, मारहाण, धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश बद्रिनाथ राठोड आणि देवा उर्फ देवा उर्फ देविदास सोमनाथ राठोड अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. देवा राठोड याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनसिटी रस्त्यावरील गॅरेजमध्ये पैशाच्या वादातून संतोष पवार याने रमेश राठोड याच्यावर गोळीबार केला होता. परंतु, त्याच्यावर केलेला गोळीबार खंडणीच्या मागणीतून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. संतोष पवार याने 2015 मध्ये रोहिदास चोरगे याच्या विरोधात वेल्हा पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दिली होती. संबंधित तक्रार दिल्याने संतोषला त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे रमेश राठोड याला मध्यस्ती करण्यास सांगितले होते. मध्यस्ती करताना रमेश हा संतोष पवारकडे पैशाची मागणी करीत होता. 24 जानेवारीलाही सनसिटी रोडवर संतोष पवार, रमेश राठोड आणि देवा राठोड यांच्यात याच कारणावरून वाद झाले. रमेश राठोड याने मारहाण केल्यामुळे पवारने त्याच्यावर गोळी झाडली. त्यामुळे रमेशच्या पायाला गोळी लागली. त्याने मध्यस्तीच्या नावाखाली आतापर्यंत 5 ते 6 लाख रुपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.