
जमीन विक्रीची उर्वरित रक्कम मागितल्याचा राग आल्यामुळे तरूणाला पिस्तूलातून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देत 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या पुणे शहरातील बुधवार पेठेतील बड्या ज्वेलर्स बापलेकासह पाच जणांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. ही घटना मे 2016 ते एप्रिल 2021 दरम्यान घडली आहे.
ज्वेलर्स गौतम जयंतीलाल सोळंकी, रणधीर जयंतीलाल सोळंकी दोघेही (रा. शुक्रवार पेठ) यांच्यासह दिलीप साहेबराव यादव, सुमीत प्रकाश साप्ते आणि सागर दत्तात्रय मुजुमले यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी राजाराम बबन गोगावले (वय – 42, रा. ससेवाडी, भोर) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजाराम मूळचे भोर तालुक्यातील ससेवाडीचे रहिवाशी आहे. त्यांची ससेवाडीतील स्वतःची जमीन आरोपींना 93 लाख रूपयांना विकली होती. त्यापैकी 32 लाख 50 हजार रूपये आरोपींनी राजाराम यांना दिले होते. त्यानंतर उर्वरित रक्कम मागण्यासाठी राजाराम सोळंकी ज्वेलर्समध्ये गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना पिस्तूलातून गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्याशिवाय 20 लाखांची खंडणी मागितली.
या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील पुढील तपास करीत आहेत.
































































