पैशांच्या वादातून पुण्यात चिकन विक्रेत्या तरूणाचा खून, दोघांना अटक

प्रातिनिधिक फोटो

हातउसने घेतलेल्या पैशांच्या वादातून चौघांनी एका चिकन विक्रेत्या तरूणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची घटना बोपोडी भागात घडली. रजनीकांत उर्फ माँटी सुंदर परदेशी (वय – 32, रा. बोपोडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी खडकी पोलिसांनी साहिल वफाद शेख (वय – 19) आणि मन्सूर मौला शेख (वय – 19, दोघेही रा. बोपोडी) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत परदेशी यांचे बोपोडी भागात चिकन विक्रीचे दुकान आहे. त्यांनी एका आरोपीकडून हातउसने पैसे घेतले होते. पैशांवरून आरोपींबरोबर त्यांचा वाद झाला होता. वादातून आरोपींनी परदेशी यांची दुचाकी ताब्यात घेतली होती.

शनिवारी सकाळी आरोपींनी परदेशी यांना बोपोडी परिसरात बोलावून घेतले. त्यांच्यावर कोयत्याने वार करून डोक्यात फरशी मारून खून केला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी तातडीने तपास करत दोघांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या