विद्येच्या माहेरघरात कट्टा संस्कृती; गोळीबाराच्या घटना थांबेनात

>> गणेश राख

सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात ‘कट्टा’ संस्कृती फोफावत असून, गोळीबाराच्या घटनांत वाढ होत आहे. मागील सलग चार दिवस पुण्यात गोळीबाराच्या घटना घडल्या असून यात तिघेजण जखमी झाले. सराईत आरोपींकडून किरकोळ गुन्ह्यासह भाईगिरीची हौस म्हणून जवळ पिस्तूल बाळगले जाते. यातूनच अनेकदा गोळीबाराचे गुन्हे घडतात. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे पुणेकर मात्र चिंतेत आहेत.

मागील चार दिवसात पुणे शहरात गोळीबाराच्या चार घटना समोर आल्या आहेत. शिवाजीनगर, सिंहगड रोड, हडपसर आणि येरवडा येथे या घटना घडल्या असून वेगवेगळ्या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी संबंधित ठिकाणच्या पोलिसांनी आरोपींना अटक केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून या घटनांत वाढ झाल्याचे दिसत आहे.

मंगळवारी दुपारी पावने तीन वाजताच्या सुमारास शिवाजीनगर येथील जंगली महाराज रस्त्यावर दोघांनी एका बांधकाम व्यवसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तूलातून गोळी न झाडली गेल्यामुळे व्यवसायिकाचा जीव वाचला. या घटनेतील आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असतानाच दुसरीकडे दुसऱ्याच दिवशी सकाळी शेवाळेवाडी हडपसर येथे व्यवसायिक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसर्‍या माजी सैनाकावर गोळीबार केला.

या दोन्ही घटनांना काही कालावधी लोटतो आहे ना तोपर्यंतच भुमकर ब्रीज नर्‍हे येथे दोघांवर गोळीबार झाल्याची घटना गुरूवारी पहाटे घडली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. माचीस मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या तिसऱ्या घटनेनंतर त्याच दिवशी मध्यरात्री येरवड्यात एका हॉटेलमध्ये तरुणावर गोळीबार झाला. यामधे तरुण जखमी झाला असून पूर्वीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते. एका मागोमाग घडणाऱ्या या घटनांमुळे आरोपींनी पोलिसांसमोर आव्हान उभे केल्याचे स्पष्ट होत आहे.

…परराज्यातून पिस्तूल पुण्यात

एकीकडे सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. कोयताधारी टोळक्यांना लगाम घालण्यात पोलिसांना यश आले आहे. असे असताना आता बेकायदा पिस्तूलाची तस्करी अन् त्यातून होणारे गोळीबार हे पोलिसांची डोकेदुखी ठरताना दिसून येत आहेत. अनेकदा घटनेतील पिस्तूल हे परराज्यातून आल्याचे वेळोवेळी समोर आलेले आहे.