
माथाडी कामगार असल्याचे सांगून काच वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाला अडवून खंडणी मागणाऱ्याला खंडणीविरोधी पथक एकने अटक केली. त्याने 8 हजार रुपये दिले नाही, तर टेम्पो रिकामा करून देणार नाही, अशी धमकी दिली होती.
माथाडी कामगार अविनाश दिलीप अडगळे (32, रा. वारजे) याच्या विरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. खंडणीविरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना वारजे माळवाडी येथील काचेच्या व्यापाऱ्याच्या दुकानात आलेला काचेचा टेम्पो रिकामा करण्यासाठी खंडणी मागत असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी पथकासह त्या ठिकाणी जाऊन खातरजमा केली. त्यावेळी अविनाश अडगळे याने टेम्पोमधून माल काढून टेम्पो रिकामा करण्याचे काम माथाडी संघटनेकडून मिळाले असल्याचे सांगितले. फिर्यादी यांनी त्याला टेम्पो रिकामा करण्यासाठी किती पैसे घेणार, असे विचारले.
फिर्यादीने त्याला दरपत्रकाप्रमाणे, रक्कम घेऊन टेम्पोमधील माल काढण्यास सांगितले. तेव्हा त्याने त्यास नकार देऊन माल खाली करण्याचे 8 हजार रुपये दिले नाही, तर माल उतरू देणार नाही , अशी धमकी दिली. त्यामुळे पथकाने त्याला ताब्यात घेतले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, एपीआय अभिजीत पाटील, उनिरीक्षक विकास जाधव पोलीस अंमलदार किरण ठवरे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, संभाजी गंगावणे यांनी केली आहे.


























































