
ग्रामपंचायत कार्यालयात शिरुन कागदपत्रे फाडून तेथील शिपायांना मारहाण केल्याची घटना शिंदवणे गावात घडली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी शंकर कांतीलाल झरड (वय – 35, रा. शिंदवणे गावठाण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मदन पोपट कांबळे (वय – 38, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
मंगळवारी सकाळी शंकर यांनी शिंदवणे ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवक कुठे आहेत अशी विचारणा केली. तेव्हा मदन यांनी ग्रामसेवकाला फोन लावून दिला. त्यांचे बोलणे झाल्यावर शंकरने आरडाओरडा करुन संगणक ऑपरेटरच्या टेबलावर ठेवलेले कागदपत्र अस्ताव्यस्त फेकून देत फाडून टाकले. त्यांना समजावण्यासाठी आलेल्या शिपायांना अरेरावी केली.
शिरवळे यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांना भिंतीला आपटून दुखापत केली. मी आत्महत्या करुन तुम्हा सर्वाविरूद्ध चिठ्ठी लिहिणार आहे, अशी धमकी शंकर यांनी दिली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
























































