दुचाकी चोरट्यांना विरोध केल्यामुळे तरूणावर वार, नऱ्हेतील घटनेने खळबळ

सोसायटीत शिरलेल्या चोरट्यांना विरोध केल्याचा राग आल्यामुळे चौघांनी तरूणाला मारहाण करून पोटात दोनवेळा चाकू मारून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना नऱ्हेतील एका इमारतीत घडली आहे. प्रमोद किसन घारे (वय – 35) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रमोद खरे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद घारे नऱ्हेतील संकल्प सोसायटीत राहण्यास आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास पार्किंग मधून आवाज येत असल्याने त्यांनी गॅलरीतून खाली पाहिले. त्यावेळी त्यांना एकजण गाडीचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. त्यामुळे घरातून खाली येउन प्रमोद यांनी त्याला विरोध केला.

काही अंतरावर उभे असलेले इतर चोरट्यांनी प्रमोद यांना मारहाण केली. एका चोरट्याने चाकू काढून प्रमोद यांच्या पोटात खुपसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर प्रमोद यांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरटे कंपाऊंड वरून उडी मारुन पळुन गेले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस तपास करीत आहेत.

तीन तास रक्ताच्या थारोळ्यात पडून

प्रमोद पहाटे साडेतीन ते सहा यावेळेत रक्ताच्या थारोळ्यात पार्किंगमध्ये पडून होते. त्यानंतर सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना पाहिल्यानंतर प्रकार उघडकीस आला. त्यांनी प्रमोद यांना रुग्णालयात दाखल करून सिंहगड रोड पोलिसांना माहिती दिली. तीन तास पडून असलेल्या घारे यांनी रक्तानेच चोरांनी हल्ला केला असल्याचे पार्किंगमधील फरशीवर लिहून ठेवले होते.

आपली प्रतिक्रिया द्या