
हडपसर भागात दहशत माजविणारा सराईत आणि सुजित वर्मा टोळीचा सदस्य ओमस्या भंडारी याला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने सातारा येथून अटक केली. मागील अनेक दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत होता.
राजकिरण उर्फ ओमस्या गणेश भंडारी (22, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून हडपसर भागात सराईत गुन्हेगारांनी डोकेवर काढले असून कोयत्याने दहशत माजवली जात आहे. नुकतेच युनिट सहाच्या पथकाने हडपसर भागातून कोयता गँगचा म्होरक्या बिट्या कुचेकर यांच्या साथीदाराला अटक केली होती. तर, दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले होते.
हडपसर भागात गुन्हे करणाऱ्यांचा शोध घेत असताना सराईत गुन्हेगार भंडारी हा सातारा जिल्ह्यातील नाझिरे गावात असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानुसार पथकाने सापळा रचून नझिरे गाव येथून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो सुजित वर्मा टोळीचा दुसऱ्या फळीतील सदस्य असुन बिट्या कुचेकर या फरारी आरोपीसोबत टार्गेट ठरवणे, गुन्ह्यासाठी अल्पवयीन मुलांची निवड करणे व हत्यार पुरविण्याचे काम करत असल्याचे समोर आले. यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने ही कारवाई केली.


























































