नानापेठेतील हत्याकांड : मुख्य सूत्रधारासह तिघे जेरबंद

पुर्ववैमनस्यातून नाना पेठेत सराईतावर कोयत्याने वार तसेच दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणात मुख्य सूत्रधारासह तिघांना गुन्हे शाखा यूनिट एकच्या पथकाने अटक केली. तिघेही रेकॉर्डवरील असून यातील मुख्य आरोपीवर तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत.

सुशांत उर्फ मट्या शशिकांत कुचेकर (28), तेजस अशोक जावळे (32), अतिष अनिल फाळके (27, रा. सर्व. नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, रोहन पवार असे खून झालेल्याचे नाव आहे. मंगळवारी (दि.२२) रात्री ही घटना घडली. नाना पेठे गजबजलेल्या वस्तीत घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. यातील काही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली. तर, मुख्य सुत्रधार कुचेकर, जावळे, फाळके यांच्यासह इतर साथीदार फरार झाले होते. गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा यूनिट एककडून सुरू होता. या दरम्यान फरार आरोपी हे नातेवाईंक व मित्रांच्या संपर्कात असल्याची माहिती अंमलदार इम्रान शेख, निलेश साबळे यांना मिळाली. या माहितीवरून अंमलदार शुभम देसाई यांनी तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपी हे आळंदी, हडपसर, कात्रज, उड्री भागात असल्याचे समजताच पथकाने उंड्री भागातून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी खून केल्याची कबूली दिली. यातील आरोपी कुचेकर याच्यावर खूनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे 16 गुन्हे दाखल आहेत. तर, जावळे याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींना शहरातून दोन वेळा तडीपार करण्यात आले होते. पुढील कारवाईसाठी आरोपींना समर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, यूनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक अशिष कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, रमेश तापकीर, अजय जाधव, महेश बामगुडे, राहुल मखरे, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, विठ्ठल साळुंखे, अमोल पवार, शशिकांत दरेकर, अनिकेत बाबर, अभिनव लडकत, दत्ता सोनवणे, तुषार माळवदकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.