
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क करत परराज्यातील तरूणींना पुण्यात आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेणार्या तिघांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. खराडी भागात छापा टाकून पोलिसांनी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील दोन तरूणींची सुटका केली. येथून एका दलालाला अटक करण्यात आली आहे.
परराज्यातील तरुणींना पुण्यात वेश्या व्यवसायासाठी आणले जात असून दलालांची टोळी सक्रीय असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. यानूसार पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून दलालांशी संपर्क साधला. दलालाने दोन तरूणींना खराडी भागात सोडले. यानूसार एका हॉटेलच्या परिसरात तरूणी आल्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक बनवून संबंधीत ठिकाणी छापा टाकला. येथून दलाल मुकेश ज्ञानेश्वर मोरे (वय 30, रा. चर्होली, आळंदी रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. तर विकी आणि राहुल या त्याच्या दोन साथीदारांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्या ताब्यातून दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. इंदूर आणि आग्रा शहरातील या तरुणी आहेत. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, अंमलदार बाबा कर्पे, अजय राणे, मनीषा पुकाळे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, संदीप कोळगे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.


























































