
अधिकृत पार्कींग असल्याचे भासवून वाहन चालकांकडून दररोज तीन ते चार हजार रूपये उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नाना पेठेतील अल्पना थिअटरजवळ घडला आहे. याप्रकरणी बंडू आंदेकरसह दोघांवर समर्थ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर थोपटे आणि बंडू आंदेकर (दोघेही रा. नाना पेठ) यांच्यावर खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव सारवाड (वय 24, रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे.
नाना पेठेतील अल्पना टॉकिजजवळील नागझरी भिंतीलगत बंडू आंदेकर, सागर थोपटे यांनी अनाधिकृत वाहनतळ उभारले आहे. ते अधिकृत असल्याचे भासविण्यासाठी आरोपींनी खोटे पावती बुक छापले होते. दुचाकी पार्कींगसाठी 10 रूपये घेतले जात होते.
तक्रारदार यांच्याकडून देखील दोन वेळा दमदाटी करून पैसे घेतले होते. त्याठिकाणी दिवसाला साडेतीनशे ते साडेचारशे दुचाकी, रिक्षा पार्कींग केल्या जातात. या सर्व वाहन चालकांना फसवून व धमकावून पार्कींगच्या नावाखाली दिवसाला साडेतीन ते साडेचार हजार रूपये उकळले जात होते. असे महिन्याला लाख रूपये गोळा केले जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर समर्थ पोलिसांनीगुन्हा दाखल केला आहे. सध्या बंडू आंदेकर याला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक केली असून त्याच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. त्याला अटक केल्यानंतर त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानंतर अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस अधिक तपास करत आहेत.

























































