पुणे शहरात कोम्बिंग ऑपरेशनद्वारे सराइतांची झाडाझडती, 685 गुन्हेगार आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी शनिवारी (दि. 11) रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराइतांची झाडाझडती घेतली. विशेष मोहिमेत 3 हजार 504 गुन्हेगारांची तपासणी केली. त्यापैकी 685 गुन्हेगार मिळून आले आहेत. त्याशिवाय अमली पदार्थ तस्करांविरूद्ध कारवाई करून इतर आरोपींकडून, पिस्तूल, कोयते, तलवारी, चाकू असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी 32 जणांना अटक केली. त्यांच्याकडून तलवारी, कोयते, पालघन, पिस्तूल, काडतुसे अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनीट एकने दिनेशकुमार कल्लुसिंग सरोज (वय 34 रा. जनता वसाहत) याला अटक केली. त्याच्याकडून 56 जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे असा 1 लाख 57 हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला. युनीट दोनने मारामारी गुन्ह्यातील फरारी प्रथमेश चंद्रकांत साबळे (वय 18) याला अटक केली. अमली पदार्थ विरोधी पथक एकने इम्रान शेख आणि आकाश वाघमारे यांना अटक करून 2 लाख 25 हजारांचे एमडी जप्त केले. अमली पदार्थ विरोधी पथक दोनने हुक्का पार्लरवर छापा टाकून साहित्य जप्त केले. हॉटेलमालक सिद्धार्थ अष्टेकर (वय 25) याला अटक केली. बेकायदा गावठी दारु विक्री प्रकरणात तीन जणांना अटक केली. 119 लिटर गावठी दारू, साहित्य असा 47 हजारांचा ऐवज जप्त केला.

रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या 391 हॉटेल, धाबे आणि लॉजची तपासणी करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान 703 संशयितांना अडवून चौकशी केली. वाहतूक विभागाने 492 वाहनचालकांकडे विविध कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये 276 दुचाकी, 19 तीनचाकी, 197 चारचाकी बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध कारवाई केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री नवटके, अतिरिक्त आयुक्त डॉ. नामदेव चव्हाण, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, उपायुक्त सागर पाटील, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, उपायुक्त रोहिदास पवार, उपायुक्त नम्रता पाटील, वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या पथकांनी केली.

कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सराइतांच्या हालचालीवर नजर ठेउन कोम्बिंग ऑपरेशन राबविले. त्यानुसार साडेतीन हजारांवर गुन्हेगारांची झाडाझडती घेउन कारवाईचा बडगा उगारण्यात आला. प्रतिबंधात्मक कारवाईमुळे भाईगिरीसह दादागिरीला जरब बसण्यास मदत होणार आहे. – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त