भाईगिरी-दादागिरी करू नका…  पुण्यात गुन्हे शाखेकडून महाविद्यालयीन तरुणांना समुपदेशनाचा डोस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील अल्पवयीन मुलांच्या वाढत्या दादागिरीविरुद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने समुपदेशनाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार विविध पथकांकडून महाविद्यालयातील तरुणांना समुपदेशनाचे धडे देण्यात येत आहेत. विशेषतः महाविद्यालय परिसरात होणारे किरकोळ वाद, गट-तट, पूर्ववैमनस्यातून भाईगिरी-दादागिरी करू नका, अन्यथा गाठ आमच्याशी आहे, अशापद्धतीने खाक्या दमही भरला जात आहे. त्याशिवाय सोशल मीडियाचा गैरवापर करीत भाईगिरी करू नका. महाविद्यालयीन जीवनात शिक्षणाला प्राधान्य द्या, विनाकारण वादातून गुन्हे दाखल होण्यास कारणीभूत ठरू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे .

मध्यवर्ती शहरासह उपनगरांमध्ये शिक्षण घेत असलेल्या काही महाविद्यालयीन तरुणांमध्ये भाईगिरीची क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून गुन्हेगारीला चालना दिली जात असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः एकमेकांकडे बघण्याचा वाद, मुलींप्रकरणी होणारी भांडणे, खुन्नस, गट-तटामुळे किरकोळ वाद गंभीर गुन्ह्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या इतर विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत आहे. त्यापार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून महाविद्यालयीन तरुणांचे समुपदेशन हाती घेण्यात आले आहे. प्रामुख्याने उपनगरातील हडपसर, कोंढवा, लोणीकंद, लोणी काळभोर, विमानतळ, चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान दिले जात आहे. त्याशिवाय गुन्हेगारीचे परिणाम, गुन्हे दाखल झाल्यास शिक्षणासह नोकरीत येणार्‍या अडथळ्यांबाबतही मार्गदर्शनावर भर देण्यात आला आहे.

काही तरुणांकडून दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेऊन शस्त्रअस्त्रांचे फोटो अपलोड करणे, वेगवेगळ्या रिल्सद्वारे धमकीवजा इशारा देणे, वाढदिवसाला तलवार किंवा चाकूने केक कापणे, दबाव टाकण्यासाठी १० ते २० दुचाकींवरून साथीदारांसोबत फेरफटका मारणे अशाप्रकारचा धुडगूस टाळण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांनी कंबर कसली आहे. त्यासाठी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, आर. के. फांऊडेशनच्या मदतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, पालकांच्या कर्तव्याची जाणीव निर्माण करून दिली जात आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गजानन टोम्पे, एसीपी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडून समुपदेशन मोहीम राबविली जात आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागृती निर्माण व्हावी, सराईत गुन्हेगारांनी मुलांचा वापर करून घेऊ नये, गुन्हेगारी रेकॉर्डमुळे जीवनाची दिशा बदलू शकते, याबाबत समुपदेशन करण्यात येत आहे. त्याशिवाय काही तरुणांमध्ये होणारे किरकोळ वाद, खुन्नस संपुष्टात आणून मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शनावर भर दिला आहे. सोशल मीडियाद्वारे दहशत निर्माण होईल अशाप्रकारचे कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याबाबतही समुपदेशन करण्यात येत आहे.

– रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे

 

शिक्षण घेताना तरुणांमध्ये काहीवेळेस संगतीचा परिणाम होऊन चुकीच्या मार्गाला जाण्याची शक्यता असते. प्रामुख्याने अतिराग, वर्चस्व, भाईगिरीची क्रेझ असल्यामुळे त्यांच्याकडून बदल्याची भावना जागृत होते. ते टाळण्यासाठी महाविद्यालयात जाऊन कायद्याबाबत समुपदेशन केले जात आहे. 

– अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

सोशल मीडियासह चित्रपट आणि रिल्सचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून गुन्हेगारीला चालना देण्याची शक्यता असते. त्यापार्श्वभूमीवर आम्ही हद्दीत हडपसरमधील महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना कायद्याबाबत मार्गदर्शन करीत आहोत. 

– रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट सहा