आंतरराष्ट्रीय टेनिसपटूच्या मदतीला धावले पुणे पोलीस, प्रवासादरम्यान रिक्षात हरवलेली रॅकेट दिली मिळवून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवासादरम्यान रिक्षात हरविलेले महागडे टेनिस रॅकेट परत मिळवून देत पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील टेनिसपटू राधिका राजेश महाजन यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांना हरवलेली 35 हजारांचे दोन रॅकेट पुन्हा मिळवून दिल्यामुळे महाजन यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

टेनिसपटू राधिका वडिलांबरोबर चेन्नई येथे गेली होती. त्यानंतर 22 ऑगस्टला ती पुण्यात परतली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून राधिका आणि त्यांचे वडील रिक्षाने घरी गेले. प्रवासात राधिकाच्या दोन टेनिस रॅकेट रिक्षात विसरल्या होत्या. त्यातच त्यांना हैद्राबाद येथील एका स्पर्धेत सहभागी व्हायचे होते. त्यामुळे महागडी रॅकेट आणि तोंडावर आलेली स्पर्धा यामुळे राधिकाच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. त्यानंतर त्यांनी तातडीने बंडगार्डन पोलीस ठाणे गाठून टेनिस रॅकेट हरविल्याची तक्रार दिली. त्याशिवाय गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्याकडेही अर्ज देण्यात आला होता.

पोलिस शिपाई विशाल दळवी आणि अमली पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाणे ते राजेंद्रनगर दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित रिक्षाचा क्रमांक मिळविला. क्रमांकावरून पोलिसांनी आरटीओ कार्यालयातून रिक्षाचालकाचा नाव, पत्ता शोधून त्याचे घर गाठले. त्यानंतर रिक्षाचालकाकडून दोन रॅकेट परत मिळवून महाजन यांना संपर्क साधला. टेनिस रॅकेट मिळाल्याचे ऐकताच राधिकाच्या डोळ्यात पाणी आले. राधिकाच्या वडिलांना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह अमली पदार्थ विरोधी पथकाचे आभार मानले.

आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडूचे महागडे रॅकेट रिक्षात विसरली होती. याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही पुâटेजनुसार रिक्षाचालकाचा क्रमांक शोधून काढला. त्यानंतर संबंधिताला बोलावून घेत, दोन्ही महागडे टेनिस रॅकेट महिला खेळाडूला देण्यात आली आहेत.

– विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक