शहरात घरफोडीचा हैदोस, शिवाजीनगर, कोथरूड, औंध, विश्रांतवाडीत चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागात चोरट्यांनी घरफोडी करून लाखोंचा ऐवज चोरून नेला आहे. चोरट्यांनी शिवाजीनगर, कोथरूड, औंध, विश्रांतवाडीतील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घराच्या दरवाजाची कडी कापून चोरट्यांनी 5 लाख 61 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी शिवाजीनगर गावठाणमधील योगेश्वर अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी मोनिका प्रशांत वैद्य यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी कोथरूडमधील पौड रस्त्यावरील चित्रसेन अपार्टमेंटमधील बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी औंधमधील अरिहंत एंटरप्रायझेसमधील दुकानाचे शटर उचकटून रोकड आणि मोबाईल असा मिळून 45 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कुणाल सुभाष जैन वय 38 यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्याशिवाय चोरट्यांनी विश्रांतवाडीतील यशश्री समृद्धी सोसायटीतील एका फ्लॅटचे कुलूप तोडून 54 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी इग्नेशेस न्यूटन थियोडर वय 61 यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.