पुण्यात व्हेल माशाच्या उलटी तस्करीचा पर्दापाश, तब्बल 5 कोटी 29 लाखांचा ऐवज जप्त

समुद्रातील व्हेल माशाच्या उलटी तस्करीतून कोट्यावधी रूपयांचा डाव डेक्कन पोलिसांनी उधळला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून व्हेल माशाच्या उलटीचे तब्बल 5 कोटी 29 लाखांचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत. डेक्कन पोलिसांच्या तपास पथकाने एवढ्या मोठ्या प्रमाणात तस्करीचा डाव उधळून लावल्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी कौतुक केले आहे.

राकेश राजेंद्र कोरड (वय 28, रा अजंले ता – दापोली), नवाज अब्दुला कुरुपकर (वय 24, रा अडखळ, अंजर्ले रत्नागिरी), अजिम महमुद काजी (वय 50 रा- अडखळ, अंजर्ले), विजय विठ्ठल ठाणगे (56) अक्षय विजय ठाणगे (वय 26 दोघही रा. धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

डेक्कन पोलीस ठाण्याचे तपास पथक 29 नोव्हेंबरला हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांना व्हेल माशाची करोडो रुपये किंमतीच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील हवालदार महेंद्र बोरसे, स्मिता पवार, विनय बडगे, सचिन गायकवाड यांनी फग्युर्सन रस्ता परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये व्हेल माशाची उलटीचे तुकडे मिळुन आले. चौकशीत त्यांनी व्हेल माशाची उलटीचे तुकडे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यांना मदत करण्यासाठी थांबलेल्या धनकवडीतील दोघांना ताब्यात घेतले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, एसीपी सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे, दत्ता शिंदे, महेंद्र बोरसे, स्मिता पवार, सचिन गायकवाड, विनय बडगे, स्वालेहा शेख, बाळासाहेब भांगले यांनी केली.

औषधे आणि परफ्यूम बनविण्यासाठी उपयोग

व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग औषधे आणि परफ्यूम बनविण्यासाठी करण्यात येतो. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन कायद्यानुसार बंदी असतानाही व्हेल माशांच्या उलटीची तस्करी करण्यात येणार होती.

व्हेल माशांच्या उलटीची तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्यांची माहिती तपास पथकाला मिळाली होती. त्यानुसार संबंधितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 5 किलो 290 ग्रॅम उलटीचे तुकडे जप्त केले आहेत. बाजारपेठेत त्याची किंमत 5 कोटी 28 लाखांवर आहे.
मुरलीधर करपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे फर्ग्युसन रस्ता परिसरात थांबल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून रत्नागिरीतील तिघांना ताब्यात घेत अटक केली. तर पुण्यातील दोघा एजण्टनाही बेड्या घातल्या आहेत. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे.
कल्याणी पाडोळे, सहायक पोलीस निरीक्षक, डेक्कन