पुण्यात कोयत्याच्या धाकाने तरूणाला लुटले, टोळक्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पायी घरी चाललेल्या तरूणाला अडवून सिगारेट आणि दारूसाठी पैसे मागून टोळक्याने लुटमार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. 9 जून रोजी रात्री एकच्या सुमारास हिंगणे खुर्द परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी चौघांना सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे.

शुभम श्रीकृष्ण सदाफुले (21), अंकित शिवाजी होटगिर (19), मयूर मोहन शिंदे (23), साहिल परमेश्वर ढगे (21) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर सुरज ढवळे (18) याने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

गुरूवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सुरज रस्त्याने पायी चालला होता. त्यावेळी परिसरात थांबलेल्या टोळक्याने त्याला अडवून सिगारेट आणि दारूसाठी पैसे मागितले. मात्र यावेळी सुरजने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्याच रागातून टोळक्याने त्याला रागाने बघतोय काय, तुला आज जिवंत सोडणार नाही, असे म्हणत कोयत्याच्या धाकाने त्यांच्याकडील ६०० रूपये काढून घेतले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले तपास करीत आहेत.

पैसे न दिल्यामुळे कामगारावर वार

मंडम बांधण्याचे काम करून घरी चाललेल्या कामगाराला अडवून त्याची लुट करत कोयत्याने वार केल्याची घटना ९ जूनला पुण्याच्या येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये घडली. याप्रकरणी अभिजीत उर्फ चड्डीभैय्या रमेश शिंदे (१९) याला अटक केली आहे. माजीद शेख (21) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील तपास करीत आहेत.