हिंदुस्थानचा बॅड डे! सिंधू, प्रणॉयच्या पराभवामुळे आशियाई बॅडमिंटनमध्ये खेळ खल्लास

दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि झुंजार एच. एस. प्रणॉय यांचा उप उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाल्याने आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतला आजचा दिवस (गुरुवार) हिंदुस्थानी संघासाठी ‘बॅड डे’ ठरला. दोघांच्या पराभवामुळे हिंदुस्थानचा खेळ खल्लास झाला आणि पॅरिस ऑलिम्पिकच्या रंगीत तालमीलाही जबर धक्का बसला.

सहाव्या मानांकित चीनच्या हान यूए हिने सिंधूचे कडवे आव्हान 21-18, 21-13, 21-17 असे मोडीत काढून या हिंदुस्थानी खेळाडूविरूद्ध कारकीर्दीतील पहिला विजय मिळविला. ही लढत एक तास नऊ मिनिटांपर्यंत रंगली. या लढतीच्या आधी सिंधूने या चिनी प्रतिस्पर्धीविरुद्धच्या पाचही लढती जिंकलेल्या होत्या, मात्र हान यूएने सिंधूची विजयाची परंपरा अखेर खंडित केली. पहिला गेम गमावल्यानंतर सिंधूने दुसरा गेम सहज जिंकून लढतीत पूनरागमन केले होते, मात्र तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये पराभूत झाल्याने तिचे ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न भंगले.

दुसरीकडे पुरुष गटात सातव्या मानांकित हिंदुस्थानच्या एच. एस. प्रणॉयला बिगरमानांकित चिनी तैपेईच्या लिन चुन यी याने 21-18, 21-11 असे अवघ्या 43 मिनिटांत हरविले. चुरशीच्या पहिल्या गेममध्ये एक-एक गुणासाठी रंगलेल्या पाठशिवणीच्या खेळात उभय खेळाडूंमध्ये तीन वेळा बरोबरी झाली, मात्र शेवटी 18-18 अशा बरोबरीनंतर लिनने सलग दोन गुण मिळवित पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये पहिल्या झटक्यात 4-1 अशी मुसंडी मारल्याचा फायदा प्रणॉयला उठविता आला नाही. लिनने ताकदवर स्मॅश आणि नेटजवळील सुरेख खेळाच्या जोरावर 15-11 असे आघाडीवर असताना सलग सहा गुणांची कमाई करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.