विचारा तर खरं…

>>उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक

मुदत ठेवींना पर्याय म्हणून म्युच्युअल फंडांच्या डेट फंड योजना गुंतवणुकीसाठी सुचवल्या जातात. यावरील भांडवली नफ्याचा लाभ आता काढून घेतल्याने या दोघांतील अधिक लाभदायक पर्याय कोणता?
 शिरीष सबनीस, विलेपार्ले, मुंबई

उत्तर – कोणतीही गुंतवणूक सुरक्षितता, उत्तम परतावा आणि रोकड सुलभता (लिक्विडिटी) म्हणजे पैसे त्वरित काढून घेता येण्याची क्षमता हे तीन प्रमुख निकष लावून केली जाते. आपल्याकडे गुंतवणुकीच्या अनेक योजना असल्या तरी दुर्दैवाने हे तीन निकष पूर्ण करणारी एकही योजना नाही. म्युच्युअल फंडांच्या डेट योजना या त्यांची 65 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक कर्जरोखे, तर 35 टक्क्यांहून कमी गुंतवणूक शेअर्स या मालमत्ता प्रकारात करतात. त्यामुळेच त्यावर मुदत ठेवींहून अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते. 1 एप्रिल 2024 नंतर केलेल्या गुंतवणुकीवरील तीन वर्षांनंतर मिळणाऱया दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभास महागाई निर्देशांकाचा लाभ घेऊन 20 टक्के सवलतीच्या दराने कर आकारणी यांसारखे लाभ यापुढे मिळणार नाहीत. केवळ त्याआधीच्या गुंतवणुकीस हे लाभ मुदत पूर्ण होईपर्यंत मिळतील. कायद्यातील या बदलामुळे मुदत ठेव आणि या सर्व योजना आता कर आकारणीच्या दृष्टीने एकाच पातळीवर आल्या आहेत. तरीही मुदत ठेवींतील गुंतवणूक आधी काढून घेतल्यास व्याजाचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता अजूनही या योजना परतावा आणि रोकड सुलभता या निकषांवर किंचित उजव्या आहेत. ज्यांना भांडवली नफ्यावरील सवलतीच्या कर दराचा लाभ घ्यायचा आहे, ते थेट कर्जरोख्यात गुंतवणूक करू शकतात. यात फारसे व्यवहार होत नसल्याने त्यांची रोकड सुलभता कमी आहे.