मी काहीही चुकीचे केलेले नाही, अश्विनने केला स्वत:चा बचाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विनने मांकड़िंगवरून जगभरातून त्याच्यावर टीका झाली. अश्विनने अखिलाडू वृत्ती दाखवल्याचा आरोप अनेकांनी केला. मात्र अश्विनने त्याने केलेला प्रकार हा नियमांतर्गत असून तो चुकलेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

काही दिवसांपूर्वी इंग्लडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत तो अश्विनचा फोटोचे तुकडे करताना दिसतोय. त्याच्या या व्हिडीओबाबत अश्विनने आज तकला दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केलं आहे. ‘आज जेम्स अँडरसनला वाटतंय मी चुकलोय पण कदाचित भविष्यात तो देखील असे काहीतरी करेल. मला नाही वाटत मी काही चुकीचे केले आहे. कारण मी जे केले ते नियमांतर्गत चुकीचे नाही. जो कुणी मला ओळखतो त्याला माहित आहे की मी नियमांबाहेर काहीही करणार नाही. माझा संघ माझ्यासोबत आहे. माझ्या देशातील खेळाडू देखील माझ्या सोबत आहेत’, असे अश्विनने या मुलाखतीत सांगितले.

किंग्ज इलेव्हन पंजाब व राजस्थान रॉयल्समध्ये झालेल्या सामन्यात पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने चेंडू टाकण्याआधी नॉन स्ट्राईककडील यष्टय़ांवरील बेल्स उडवल्या. त्यावेळी जोस बटलर धाव घेण्यासाठी क्रीझ बाहेर निघाला होता. त्यामुळे पंचांनी त्याला बाद ठरवले. रविचंद्रन अश्विनच्या या कृत्यामुळे चोहोबाजूंनी त्याच्यावर टीका करण्यात आली