
हिंदुस्थानी ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने पुन्हा एकदा जगाला थक्क केले. त्याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या फेरीतील थरारक क्लासिकल सामन्यात जगातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनचा पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. बहुतांश वेळ सामना आपल्या नियंत्रणात ठेवणाऱ्या प्रज्ञानंदसमोर यजमान देशाचा कार्लसन दबावाखाली चुकला आणि त्याची मोठी किंमत त्याला मोजावी लागली.
यंदाच्या स्पर्धेत कार्लसन नेहमीच्या आक्रमक लयीत दिसत नसला तरी त्यालाच त्याच्या मायभूमीत धूळ चारणे ही जागतिक बुद्धिबळातील मोठी कामगिरी मानली जाते. सुपरबेट रोमानिया स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर प्रज्ञानंदने तीच विजयी घोडदौड येथेही कायम राखली आहे. या दणदणीत विजयानंतर त्याचे 4.5 गुण झाले असून, तो दुसऱ्या स्थानावर झेपावला आहे. विशेष म्हणजे, 2024 मध्ये याच स्पर्धेत प्रज्ञानंदने प्रथमच क्लासिकल प्रकारात कार्लसनला नमवले होते.
दरम्यान, विश्वविजेता डी गुकेशला अलीरेजा फिरौजाविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यानंतर झालेल्या आर्मागेडन लढतीत अलीरेझा फिरौझा याने बाजी मारत अतिरिक्त गुण खिशात घातले आणि स्पर्धेतील आपली आघाडी कायम ठेवली. विन्सेंट कीमर आणि वेस्ली सो यांच्यातील क्लासिकल सामनादेखील बरोबरीत सुटला. मात्र, आर्मागेडनमध्ये वेस्ली सो याने विजय मिळवत अतिरिक्त गुणांची कमाई केली. तिसऱ्या फेरीनंतर फिरौजा अव्वल स्थानावर कायम आहे.




























































