कमालच! भंगारापासून बनवली रेसिंग कार!!नागपूरच्या पठ्ठय़ाची कमाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरमधील एका पठ्ठय़ाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. सर्वसामान्य कुटुंबातील या तरुणाने भंगारातील सामानापासून चक्क रेसिंग कार तयार करत आपले स्वप्न पूर्ण केले आहे. सध्या ही रेसिंग कार नागपूरकरांचे लक्ष वेधत आहे. कारचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून तरुणाच्या या भन्नाट जुगाडाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्वप्नील काशीनाथ चोपकर असे या तरुणाचे नाव आहे. तो नागपुरातील रामेश्वरीच्या पार्वतीनगर येथे राहतो. त्याचे वडील बेकरीत चालक म्हणून काम करतात तर त्याची आई फिजिओथेरेपिस्ट आहे. स्वप्नील सध्या एम. कॉमचे शिक्षण घेत आहे. लहानपणापासून त्याला गाडय़ांची फार आवड. याच आवडीपोटी शिक्षण घेत असताना त्याने गॅरेजमध्ये काम करणे सुरू केले. आपली स्वतःची गाडी असावी, अशी इतर तरुणांप्रमाणे त्याची ईच्छा होती. ‘ईच्छा असेल तर मार्ग निघतोच’ ही म्हण त्याने सत्यात उतरवली. पैसे नसल्याने त्याने तांत्रिक जुगाड करत भंगारातील साहित्यापासून रेसिंग कार साकारली आहे.

ही कार बनवण्यासाठी स्वप्नीलला दहा महिन्यांचा वेळ लागला असून सवा लाख रुपयांचा खर्च आला आहे. या कारमध्ये स्वप्नीलने  800 सीसी क्षमतेचे इंजिन बसवले आहे. ही कार फॉर्म्युला वन कार दिसायला हवी, त्याप्रमाणे त्याने गाडीचे पार्टस् बनवले. एक लिटर पेट्रोलमध्ये ही कार 16 ते 17 किमी अंतर कापते. पहिल्या दोन गिअरमध्ये ही कार ताशी 90 किमी धावल्याचा दावा स्वप्नीलने केला आहे. ही कार रस्त्यावर धावण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी आता तो प्रयत्न करणार आहे.

अपयशाने खचला नाही 

लॉकडाऊनच्या काळात त्याने रेसिंग कार बनवायला सुरुवात केली. पहिल्या दोन प्रयत्नात तो अपयशी ठरला, परंतु खचून न जाता त्याने आणखी परिश्रम घेतले आणि तिसऱया प्रयत्नात यश मिळवले. 26 जानेवारीला नागपूरमधील रस्त्यांवर त्याने कारचे यशस्वी ट्रायल घेतले आहे. त्याची ही रेसिंग कार नागपूरकरांचे लक्ष वेधून घेत आहे. 

 ही कार बनविण्यासाठी स्वप्नीलने 10 महिन्यांची अथक मेहनत घेतली असून त्याला सवा लाख रुपयांचा खर्च आला आहे. कारसाठी 800 सीसीचे इंजिन बसवले आहे. कारची रचना त्याने फॉर्म्युला वन कारसारखी केली आहे.