जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंग, दहावीतील 35 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; अकरावीच्या विद्यार्थ्यांचे गंभीर कृत्य

पालघरच्या माहीम जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंगचा प्रकार समोर आला आहे. अकरावीतल्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या 35 विद्यार्थ्यांना थातुरमातुर कारणावरून बेदम मारहाण केली आहे. यात एका विद्यार्थ्याच्या नाकातून रक्त आले असून काही मुलांच्या कानाला दुखापत झाली आहे. हा प्रकारच विद्यालय व्यवस्थापनाला माहीत नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला.

अकरावीतील सहा ते सात विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता उदयगिरी हाऊसमध्ये दहावीच्या 35 विद्यार्थ्यांना बोलावले होते. त्यावेळी उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांच्या गालावर सात ते आठ वेळा जोरदार मारण्यात आले. धक्कादायक म्हणजे यातील एका विद्यार्थ्याच्या गुप्तांगावर गुडघ्याने मारण्यात आले आहे. शर्ट इन नसतात, तुम्ही बूट घालत नाहीत, तुमचा मेसमध्ये आवाज असतो, तुम्ही जेवायला येत नाहीत अशी फालतू कारणे सांगून या विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. याबाबत कोणालाही सांगू नका, असा दमदेखील या मुलांना देण्यात आला होता, परंतु एका विद्यार्थ्याचा कान जास्त दुखू लागल्याने या प्रकाराचा भंडाफोड झाला आहे. निखिल सिंग, विशाल कुशवा व सुशांत सोनकर या मुलांना मारहाणीत गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, याबाबत पालकांनी जाब विचारल्यानंतर प्राचार्यांनी याची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.