
अयोध्येच्या राम मंदिरातील चोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेल्या मौनावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हजारो कोटींची चोरी होऊनही तुम्ही मौन का? ‘याप्रकरणी जबाबदारी निश्चित करणे हे तुमचे कर्तव्य आहे. देश बघतो आहे. तुम्ही कारवाई कधी करणार,’ असा सवाल राहुल गांधी आणि खरगे यांनी पंतप्रधानांना केला आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी राहुल गांधी व खरगे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी अनेक द्दे उपस्थित केले आहेत. ‘राम मंदिरासाठी लाखो भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने आपली कष्टाची कमाई दान केली होती. ट्रस्टमधील गैरव्यवहारांमुळे फसवणूक झाल्याची त्यांची भावना आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, तुम्ही संसदेत या ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा केली होती, त्यातील सदस्यांची नियुक्ती पूर्णपणे तुमच्या सरकारने केली आहे. ट्रस्टचे सदस्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांचे आहेत, हे जगजाहीर आहे. या ट्रस्टचे वादग्रस्त ठरलेले माजी सरचिटणीस हेदेखील तुमचे निकटवर्तीय होते. असे असताना या गुह्याविषयी तुम्ही बाळगलेले मौन अस्वीकार्य आहे, असे पत्रात म्हटले आहे. ‘तुमचे सरकार आणि राम जन्मभूमी ट्रस्टची विश्वासार्हता तुम्ही किती पारदर्शकपणे आणि वेगाने पृती करता यावर अवलंबून आहे, असेही शेवटी नमूद करण्यात आले आहे.
विरोधी पक्षनेत्यांच्या मागण्या
‘मंदिराला रोख रक्कम, सोने आणि चांदीच्या स्वरूपात मिळालेल्या देणग्यांसह ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची त्वरित स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी करण्याचे आदेश द्या.
आपल्या देणगीचा वापर कसा झाला हे प्रत्येक भाविकाला कळण्यासाठी चौकशीचे निष्कर्ष आणि ट्रस्टचे हिशेब सार्वजनिक करा.
या प्रकरणातील दोषींवर त्यांचे पद किंवा प्रभाव न बघता कायदेशीर कारवाई करा.





























































