राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश करणार

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी 12 मार्च रोजी दुपारी 2 वाजता नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. त्यानंतर 13 मार्चला धुळे, मालेगाव, 14 मार्चला नाशिक, 15 मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा 16 मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. 17 मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होत आहे. याचवेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात 15 जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली असून यात्रेची सांगता मुंबईत होत आहे. ही यात्रा 15 राज्ये, 100 जिल्हे, 110 लोकसभा मतदारसंघातून 67 दिवसांत 6700 किमीचा प्रवास करत आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रा, न्याय का हक मिलने तक’ या घोषवाक्यासह ही यात्रा मार्गक्रमण करत आहे. मागील वर्षी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर 4000 किलोमीटरची पदयात्रा काढली होती. या यात्रेला जनतेचे प्रचंड समर्थन लाभले होते तसाच भारत जोडो न्याय यात्रेलाही जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पक्षाकडून भारत जोडो न्याय यात्रेत अडथळे आणण्याचा जाणीवपूर्क प्रयत्न केला पण यात्रा न डगमगता सुरुच राहिली. भारत जोडो न्याय यात्रेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जय्यत तयारी केली असून मुंबईत राहुल गांधी व न्याय यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यात्रेला व शिवाजी पार्क वरील जाहीर सभेला प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांना दिले यात्रेचे निमंत्रण

भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण देण्यासाठी सोमवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मातोश्री येथे येऊन उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.