
मोदीजी, तुम्हाला जे करायचे आहे ते करा. 10 हजार, 20 हजार किंवा 50 हजार कितीही पोलीस बोलवायचे असतील तर बोलवा. सर्व नेत्यांना अटक करा, तुरुंगात टाका. आम्ही तुम्हाला चहुबाजूंनी घेरले आहे. आम्ही आता मागे हटणार नाही, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला थेट आव्हान दिले.
पाच जणांना म्हटले ‘व्हिलन’
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये थेट पाच मोठय़ा नावांचा उल्लेख ‘व्हिलन’ म्हणून केला. नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, ज्ञानेश कुमार आणि अजित डोवाल हे या कथेचे मुख्य ‘व्हिलन’ आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) कडाडून टीका केली. त्यात ते म्हणाले की, मी गेल्या दशकभरापासून यांच्याविरोधात लढत आहे. भीती आणि पळपुटेपणा हाच या लोकांचा मुख्य स्वभाव आहे. मोदीजी, तुम्हाला जे करायचे आहे ते करा. 10 हजार, 20 हजार किंवा 50 हजार… कितीही पोलीस बोलवायचे असतील तर बोलवा. सर्व नेत्यांना अटक करा, तरुणांना अटक करा, सर्वांना तुरुंगात टाका. आम्ही तुम्हाला चहुबाजूंनी घेरले आहे आणि आम्ही आता अजिबात मागे हटणार नाही. हे माझे शब्द लक्षात ठेवा, आम्हाला जी माहिती हवी होती, ती आमच्याकडे आधीच आली आहे, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी मोदी सरकारला थेट आव्हान दिले.
मोदी सरकारच्या हुकूमशाही राजवटीवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, गेल्या 10 ते 15 वर्षांत भारताचे जे नुकसान केले गेले आहे, ते पुन्हा कधीही होऊ दिले जाणार नाही. देशातील तरुणांनो, मला तुमचा अभिमान आहे. तुमचे आंदोलन सुरू ठेवा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. संविधान ओरबाडणाऱ्या या राजवटीचा पराभव आम्ही निश्चित करू, असे राहुल गांधी म्हणाले.




























































