बराक ओबामा यांच्या आत्मचरित्रात राहुल गांधी यांचा उल्लेख…गृहपाठ पूर्ण केलेला विद्यार्थी पण….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील निवडणुकांची रणधुमाळी थंडावत असतानाच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. या आत्मचरित्रात काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काही नेत्यांचा उल्लेख असल्याने ओबामा यांचे पुस्तक चर्चेत आहे. तसेच जगातील काही दिग्गज नेत्यांचा उल्लेखही या पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकात राहुल गांधी यांच्याबाबत उल्लेख असल्याने राजकीय वर्तुळातही याची चर्चा आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘ए प्रॉमिस्ड लँड’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आपले अनुभव मांडले आहेत. तसेच जगातील नेत्यांबाबतची आपले मते आणि दृष्टीकोनही व्यक्त केले आहेत. या पुस्तकात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख चर्चेचा विषय ठरला आहे. गृहपाठ पूर्ण केलेल्या विद्यार्थी ज्याप्रमाणे शिक्षकांवर छाप पाडण्याचा प्रयत्नात असतो, त्या विद्यार्थ्याप्रमाणे राहुल गांधी असल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे. नर्व्हस आणि अपरिपक्व विद्यार्थ्याप्रमाणे ते आहेत. विचारातील सखोलता आणि योग्यता त्यांच्यात नाही. तसेच कोणतीही गोष्ट मिळवण्याची किंवा त्यात प्राविण्य दाखवण्याची तडफ त्यांच्यात नसल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे.

ओबामा यांनी आपल्या पुस्तकात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही उल्लेख केला आहे. मनमोहन सिंग सच्चे आणि इमानदार व्यक्तिमक्त असून त्यांचे हे गुणच त्यांचे वेगळेपण ठरतात असे ओबामा यांनी म्हटले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन कठोर आणि स्मार्ट बॉसप्रमाणे वाटतात, असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्समध्ये पुस्तक परीक्षणासह पुस्तकातील काही भाग प्रकाशित करण्यात आला आहे.

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या जो बायडन यांचा उल्लेख ओबामा यांनी सभ्य व्यक्ती असा केला आहे. त्यांच्यात गुणवत्ता असल्याचेही ओबामा यांनी नमूद केले आहे. या पुस्तकात विविध नेत्यांबाबतची ओबामा यांची मते आहेत. या आत्मचरित्रात त्यांच्या आयुष्यातील घडामोडींपेक्षा राजकीय घड़ामोडींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

या आत्मचरित्रात ओबामा यांच्या राजकीय कारर्किर्दीला सुरुवात झाल्यापासून ते पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये दहशतवाद्यांचा म्होरक्या ओसाबा बिन लादेनच्या खात्मापर्यंतच्या घडामोडींपर्यंतचे वर्णन आहे. मात्र, राजकीय नेत्यांच्या उल्लेखामुळे हे पुस्तक चर्चेचा विषय़ ठरला आहे. राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या उल्लेखामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू आहे. या पुस्तकातील उल्लेखाचा आधार घेत काही भाजप नेत्यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे.