मोदी म्हणजे पोकळ व्यक्ती, राहुल गांधी यांचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता रविवारी मुंबईत झाली. शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी हा एक मुखवटा आहे. त्यांची 56 इंचाची छाती नाहीये तर ते एक पोकळ व्यक्ती आहेत, अशी जोरदार टीका राहुल गांधी यांनी केली.

नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, राजाचा जीव ईव्हीएम, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स या सगळ्यांमध्ये आहे. यांच्याच बळावर ते नेत्यांना धमकावून भाजपमध्ये सहभागी व्हायला भाग पाडत आहेत. सगळ्या पक्षांचे लोक असेच घाबरून भाजपमध्ये गेले आहेत. नरेंद्र मोदी हे बॉलिवूड कलाकारांसारखे आहेत. त्यांना काही काम करायला सांगितलं की जसं ते करतात, तसंच मोदींचं आहे. त्यांची छाती 56 इंचांची नाही, तर ते एक पोकळ व्यक्ती आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

आज नरेंद्र मोदी यांच्याकडे भ्रष्टाचाराची मोनोपॉली आहे. निवडणूक रोख्यांची योजना म्हणून त्यांनी काढली. जसं रस्त्यावर खंडणी वसूल केली जाते, तसंच ते भाजप सरकारमध्ये करतात. कंपनीला कंत्राट मिळतं मग ते थेट निवडणूक रोखे खरेदी करतात. ज्या कंपनीला फायदा नाही, त्याहून दुप्पट रक्कम ते भाजपला देत आहेत, असा निशाणा राहुल गांधी यांनी यावेळी साधला.