सहलीदरम्यान शिक्षकाचे मुलीसोबत गैरवर्तन राहुरीतील घटना; चौकशी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहुरी तालुक्यातील शाळेच्या सहलीत शिक्षकाने मुलीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पालकांनी गटशिक्षणाधिकाऱयांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. मुलींची छेड काढणाऱया एका शिक्षकाला गजाआड केल्याच्या घटनेला महिना उलटत नाही तोच घडलेल्या या दुसऱया घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

राहुरी तालुक्यातील शाळेची सहल मुंबई परिसरात गेली होती. या सहलीदरम्यान शिक्षकाने मुलीशी गैरवर्तन केले. सहलीवरून घरी परतल्यानंतर मुलीने पालकांना हा प्रकार सांगितला. बदनामीच्या भीतीने पालकांनी पोलिसांत तक्रार देणे टाळत शाळा व्यवस्थापनाकडे शिक्षकाच्या बदलीची मागणी केली. मात्र, त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे पालकांनी हा प्रकार गटशिक्षणाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. चौकशीत शिक्षकाचा जबाब नोंदविला जाईल. त्यात ते दोषी आढळले तर कारवाईचे आश्वासन पालकांना देण्यात आले. चौकशीसाठी शनिवारी शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शाळेत ठाण मांडून होते. संबंधित प्रकरणाबाबत लेखी जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

एका शाळेतील मुलींसह पालकांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. प्रकरणात सत्य काय, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. दोन ते तीन दिवसांत योग्य ती कारवाई केली जाईल. शिक्षणक्षेत्रात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. शिक्षणक्षेत्राचे पावित्र्य राखण्यासाठी तालुका शिक्षण विभाग योग्य तो निर्णय घेईल.

– गोरक्षनाथ नजन, गटशिक्षणाधिकारी, राहुरी.