निवडून आले तरी ते बेईमानीच करतील; रायगड काँग्रेसचा तटकरेंवर विश्वास नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunil-tatkare

सामना ऑनलाईन । अलिबाग

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रायगड लोकसभेचे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर रायगड काँग्रेसचा काडीमात्र विश्वास उरलेला नाही. काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेश समिती सदस्य मधुकर ठाकूर यांनीच जाहीर पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट केला आहे. केवळ पक्षश्रेष्ठींचा आदेश म्हणूनच त्यांना नाइलाजाने पाठिंबा देत आहोत, असेही ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे तटकरेंच्या वाटेत काँग्रेसचे ‘काटे’ असल्याचे समोर आले आहे.

लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना पाठिंबा द्यायचा की नाही यावर विचारविनिमय करण्यासाठी अलिबाग, मुरुड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची सभा आज अंतुले भवन येथे झाली. या सभेत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी मधुकर ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तटकरेंचे जाहीर वाभाडेच काढले. ते म्हणाले, काँग्रेस आणि मित्रपक्षांची एक जागा निवडून येणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या मित्रपक्षांच्या उमेदवाराचा प्रचार करा असे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. म्हणूनच केवळ आम्ही नाइलाजाने तटकरेंचा प्रचार करणार आहोत. त्यांच्यावर आमचा काडीमात्र विश्वास नाही. तटकरेंना पाठिंबा दिला तर काँग्रेसचे नुकसान होणार आहे हेही आम्हाला माहिती आहे. नंतर ते कसे पलटी मारतील याचीही आम्हाला कल्पना आहे. त्यांनी बेईमानी केली तर नंतर आम्ही पाहूच.. असा गर्भित इशाराही यावेळी ठाकूर यांनी दिला.