10 दिवसात मंदिर रिकामं करा! रेल्वेने पाठवली हनुमानाला नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय रेल्वे विभाग सध्या झारखंडमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. कारण, येथील धनबाद रेल्वे विभागाने हनुमान मंदिराला नोटीस पाठवून जागा रिकामी करायला सांगितली आहे. त्यासाठी दहा दिवसांची मुदतही देण्यात आली आहे.

रेल्वेच्या या नोटीसीवरून स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. येथील बेकारबांध परिसरात एक हनुमान मंदिर आहे. या मंदिराला नोटीस पाठवून रेल्वेने दहा दिवसांच्या आत मंदिर तिथून हटवण्याचा इशारा दिला आहे. त्या नोटीसीत भगवान हनुमानांचा उल्लेख करण्यात आला आहे. ही जमीन जिथे मंदिर उभं आहे, ती मूळची रेल्वेची असून हनुमान यांनी ही जमीन अवैध पद्धतीने काबीज केली असल्याचं नोटीसीत म्हटलं आहे.

ही नोटीस मंदिराला चिकटवण्यात आली आहे. पुढील 10 दिवसात मंदिराची जागा रिकामी करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यात देण्यात आला आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त करत आंदोलन केलं आहे. या मंदिराच्या बाहेर जमा होऊन रेल्वेने आधी अशा अनेक जमिनी ताब्यात घ्याव्यात, मग मंदिराला नोटीस पाठवावी, असं नागरिकांचं म्हणणं आहे.