निलंगा तालुक्यातील औराद परिसराला पावसाने झोडपले

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात सोमवार, दिनांक 24 जुलै रोजी संध्याकाळी चार ते साडेपाचच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. यामुळे परीसरात अनेक भागातील रस्त्यावर पाणी वाहत असल्याने रहदारीस अडथळा झाला आहे. तसेच सखल भागातील अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये व शाळांमध्ये पाणी घुसल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, निलंगा तालुक्यात चार ते पाच दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने सर्व पिके जोमात दिसत होती. पण, दिनांक 24 रोजी संध्याकाळी चार ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान आलेल्या जोरदार पावसामुळे तगरखेडा ते औराद शहाजानी रस्त्यावरील रहदारी बंद झाली. तसेच राष्ट्रीय महामार्ग लातूर- जहिराबाद वरील शेजारील कर्नाटक हद्दीतील जामखंडी येथील पर्यायी पूल वाहून गेल्याने सदर महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. शिवाय औरादसह परिसरातील अनेक ओढ्यांवरील पुलावरून पाणी वाहत होते. दोन तास रहदारीस अडथळा झाला असल्यामुळे रहदारी बंद झाली होती.

तगखेडा, औराद, हालसी (तु.), सावरी, मानेजवळगा, शेळगी, बोरसुरी आदी गावातील ओढ्याच्या पुलावर पाणी वाहत असल्यामुळे या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्याने अनेक नागरिकांना जवळपास दोन तास अडकून थांबावे लागले होते. दरम्यान तेरणा नदीवरील औराद येथील उच्चस्तरीय बंधार्‍याची दोन दारे उघडण्यात आली होती. महामार्ग शेजारील नाल्यांचे बांधकाम व्यवस्थित झाले नसल्यामुळे महामार्गाचे पाणी शेजारील अनेक व्यापार्‍यांच्या दुकानांमध्ये, घरामध्ये, शाळा विद्यालयामध्ये घुसले होते.

महामार्ग शेजारील वसंतराव पाटील विद्यालय व महाराष्ट्र विद्यालय सिध्देश्वर भोजनालय आदी हॉटेल, किराणा फर्टिलियझर्स आदी व्यापारी दुकानात व घरामध्ये पाणी घुसल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक शेतकर्‍यांना सुध्दा या पावसामुळे फटका बसला आहे. कारण, अनेकांच्या शेताचे बांध फुटुन माती वाहुन गेली तर कांही शेतकर्‍यांच्या पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.

काल झालेल्या दीड ते दोन तासात 56 मि.मी. व दिवसभरात 64.2 मि.मी. पाऊस झाला असल्याची नोंद येथील हवामान केंद्रात झाली असल्याचे हवामान मापक मुकरम नाईकवाडे यांनी सांगितले. औराद शहाजानीसह परीसरात जोरदार पाऊस झाल्याने या भागाचे तहसीलदार उषाकिरण शृंगारे आणि नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर यांनी परिसराची पाहणी केली. तसेच तलाठी, मंडळ अधिकारी यांना मुख्यालयी हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी दैनिक सामनाला सांगितले.