मतपत्रिकेवर निवडणुका नाहीत तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकावा, राज ठाकरे यांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईव्हीएम विरुद्ध मतपत्रिकांवरील निवडणुकांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवर होत नाहीत तोपर्यंत थेट निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राज्यातील विविध राजकीय विषयांवर या नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवर होत नाहीत तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार घातला पाहिजे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही हीच भूमिका असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

इंडिया आघाडीच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार सुप्रिया सुळे 

राज ठाकरे यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही पाठिंबा दिला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या राज ठाकरे यांनी दिलेली ही सूचना नक्कीच चांगली आणि विचार करण्यासारखी आहे. येत्या 8 जून रोजी नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची होणाऱया बैठकीत हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवरील सर्व नेत्यांसमोर प्रकर्षाने मांडणार असून या बहिष्काराच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा केली जाईल, असे त्या म्हणाल्या.