
राजस्थानमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एक तीन मुलांची आई सहा मुलांच्या बापासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. तिच्या या कृत्याने तिच्या नवऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेहाशजारी सुसाईड नोट सापडली असून त्यात पत्नी आणि तिच्या प्रियकरासह पाच जणांवर आरोप केले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. भंवरलाल असे त्या मृत इसमाचे नाव आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट सापडली आहे. ज्यामध्ये त्याने आपली पत्नी आणि तिच्या प्रियकरासह पाच लोकांवर आत्महत्येबाबत दोषी ठरवले आहे. ओसिया पोलीस अधिक्षक नूर मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत भंवरलाल याची पत्नी किशना आणि तिचा प्रियकर मोहनराम वेगवेगळ्या प्रकरणात तुरुंगात जाऊन आले आहेत. त्याची पत्नी याआधीही मोहनरामसोबत पळाली होती. मोहनरामने वर्षभरापूर्वी किशना देवी त्याची मानलेली बहिण असल्याचे भासवले होते. त्यानंतर त्याचे भंवरलाल याच्या घरी येणेजाणे वाढले आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले होते.
मृत भंवरलाल याची पत्नी सहा-सात महिन्यांपूर्वी तीन मुलांना सोडून सहा मुलांचा बाप मोहनराम याच्यासोबत पळून गेली. त्यानंतर भंवरलाल याने पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भंवरलाल याची पत्नी किशनाने तिचे मोहनरामवर प्रेम असून त्याच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून भंवरलाल मानसिक तणावाखाली होता. त्याने आपला संसार टिकविण्यासाठी सासरच्या लोकांकडून मदत मागितली. मात्र कोणीही भंवरलालची मदत केली नाही.
पोलिसांना तपासादरम्यान कळलं की, भंवरलाल यांची पत्नी आपल्या प्रियकरासोबत रोज एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करायची. ज्यामुळे भंवरलाल मानसिक तणावाखाली आला होता आणि सोमवारी त्याने झाडाला फास घेऊन आत्महत्या केली. त्यासोबत सुसाईड नोट ठेवून पाच जणांचा उल्लेख होता. शवविच्छेदन केल्यानंतर भंवरलाल याच्या कुटुंबियांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या पाच जणांना अटक केल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मात्र पोलिसांनी त्यांनी बरंच समजावल्यानंतर ते मृतदेह ताब्यत घेण्यास तयार झाले. पोलीस उपअधिक्षक नूर मोहम्मद यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची गंभीरतीने तपास सुरु असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.






















































