
>> राजदत्त
स्वरकोकिळा लता मंगेशकर यांचा सूर कानावर पडत नाही असा एकही दिवस जात नाही. आज माझं वय नव्वद, तर सिनेसृष्टीत माझी कारकीर्द पाच दशकांहून अधिक. मागे वळून पाहतो तर सर्व पट झरझर डोळय़ांसमोरून सरकतोय. माझ्याप्रमाणे अनेक दिग्दर्शकांच्या कारकीर्दीत लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा मोठा हात आहे. खरं तर एकेकाळी माझी थांबलेली कारकीर्दच त्यांनी सुरू केली होती. त्याबद्दल मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
जेव्हा मी सिनेजगतापासून फार फार दूर होतो तेव्हापासून दीदींच्या गाण्यांचा चाहता होतो. मी विदर्भातून आलो होतो. पूर्वी मी ज्या चाळीत राहायचो तिथे रेकॉर्ड्स लावल्या जायच्या. त्या वयात गाणं, संगीत यातलं काहीही मला माहीत नव्हतं. फक्त एकच आवाज कानात गुंजत राहायचा. तो आवाज म्हणजे लता मंगेशकर.
बीकॉम झाल्यावर मी सर्वप्रथम पुण्यात आलो. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात राहत होतो. तिथे एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये दादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामाबाबत ठरलं. मुक्तिसंग्रामात गायक सुधीर फडके यांनी स्वतः सहभाग घेतला होता. सुधीर फडके, मोहन रानडे यांच्यासोबत मी दादरा नगर हवेलीत जात असे. तिथल्या नागरिकांमध्ये विशेषतः आदिवासींमध्ये स्वातंत्र्याबद्दल आम्ही जागृती करत होतो. त्यादरम्यान आमचा जो राहण्याचा, जेवणाचा खर्च होता तो लता मंगेशकर करत होत्या. दीदींची मदत करण्याची पद्धत वेगळी होती. त्या कधी कार्यक्रमात आल्या नाहीत, भेटल्या नाहीत. पण मोहिमेचा अधिकतर आर्थिक भार त्या सांभाळत होत्या हे मला नंतर समजले. जवळपास चार-सहा महिने आम्ही दादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात जागृतीपर कार्यक्रम केले. तो सारा खर्च दीदी करायच्या. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय त्यांचे हे काम सुरू होते. दादरा नगर हवेली स्वतंत्र झाली तेव्हा सुधीर फडपेंनी पहिला पह्न लतादीदींना केला. दोघांच्यात काय बोलणं झालं माहीत नाही, पण फडके यांच्या चेहऱयावर खूप आनंद दिसत होता. मुक्तिसंग्रामाचा गोवर्धन अनेकांनी उचलला होता. त्यामध्ये एक बोट माझंही लागलं होतं याचा अपार आनंद होता.
पुढे मी चित्रपट व्यवसायात आलो. ‘मधुचंद्र’ हा माझा चित्रपट खूप गाजला. मी यशाच्या मस्तीत होतो. पण त्यानंतर सात-आठ महिने मला कामच नव्हते. मी दुसरं काम करायच्या निर्णयाप्रत आलो. निघण्यापूर्वी सुलोचनाबाईंचा निरोप घ्यायला मी गेलो. त्यांना सांगितलं की, आठ महिने झाले, मला काम नाही, मी लग्नही करून बसलोय. खर्चही वाढलाय. आता मी काय करू. पण सुलोचनाबाईंनी मला थांबवलं. त्या म्हणाल्या, तू भालजींकडे जा, त्यांचा असिस्टंट म्हणून काम कर. त्यांनी मला कोल्हापूरला पाठवले. मी भालजींना भेटलो. भालजींनी मला असिस्टंट म्हणून काम देणार नाही असं सांगितलं. पण त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या स्क्रीप्ट वाचण्याचे काम मला दिले. त्यातील कोणती स्क्रीप्ट आवडली असंही विचारले. मी ‘घरची राणी’ स्क्रीप्ट आवडल्याचे सांगितले. त्यावेळी तिथे बाजूला लतादीदी बसल्या होत्या. त्या सगळं ऐकत होत्या. मला त्याची जराही कल्पना नव्हती. मी ‘घरची राणी’ चित्रपट दिग्दर्शित केला. तो 1969 साली प्रदर्शित झाला. ‘घरची राणी’ला चांगले यश मिळाले. अगदी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला. पुरस्काराची बातमी कानावर येताच मी तडक कोल्हापूर गाठले. भालजींना नमस्कार केला. भालजी म्हणाले, अरे, मला नमस्कार करू नकोस. लतानेच तुला चित्रपट द्यायला सांगितला होता. तसेच चित्रपटासाठी पैसेही पुरवले. त्यामुळे तू मुंबईला जाऊन लताला नमस्कार कर. मी मुंबईला आलो, लतादीदींच्या घरी गेलो. भालजी, माझे गुरू राजा परांजपे, अनंत माने, दत्ता धर्माधिकारी असे मोठे दिग्गज स्पर्धेत असताना माझ्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला होता. मी आनंदी होतो. दीदींना म्हटलं, ‘घरची राणी’ साठी तुम्ही पैसा दिला हे मला माहीत नव्हतं. ते मला आता कळतंय. मी समजत होतो की, भालजींचा चित्रपट आहे. दीदींना मी अक्षरशः साष्टांग नमस्कार केला. माझ्या थांबलेल्या कारकीर्दीला त्यांनी गती दिली होती. कसे विसरणार त्यांचे उपकार. तेव्हापासून दीदींची आणि माझी चांगली ओळख झाली. खूप गप्पा रंगायच्या. दीदी खूप साध्या होत्या. त्यांनी केलेल्या कामाचा कधी बडेजाव केला नाही, प्रसिद्धी केली नाही. माझ्यासारख्या अनेकांच्या कारकीर्दीला त्यांच्या गाण्यांचा अमृतस्पर्श झाला. त्यांच्या सुरांनी रोजच्या जगण्यात प्राण फुंकले आहेत. आजही एकांतात बसून दीदींची गाणी ऐकत बसतो. काही माणसांचं ऋण फेडायचं ठरवलं तरी फेडता येणार नाही. लतादीदी यांच्याबाबत मी हेच म्हणेन.
(लेखक हे ज्येष्ठ सिने दिग्दर्शक आहेत.)


























































