श्रीरामपूरातील अनधिकृत गणेश पॅथॉलॉजी लॅबोरेटरीवर कारवाई करा; राजेश टोपे यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीरामपूर शहरातील डॉ. सदावर्ते हॉस्पिटलमधील गणेश क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅबोरेटरी चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रा. नयना प्रदीप परदेशी यांनी याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे.

श्रीरामपूर शहरात अनधिकृत गणेश पॅथॉलॉजी लॅबोरेटरी चालकांकडे एम. डी. पॅथॉलॉजी ही पदवी नाही. शासन नियमानुसार पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन हा रक्त, लघवी सॅम्पल घेऊन फक्त तपासणी करू शकतो, असे असताना गणेश पॅथॉलॉजी चालक स्वतः एम. डी. पॅथॉलॉजीच्या स्वाक्षरी करून रुग्णांना रिपोर्ट देतात. कोविड-19 च्या काळात रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याची परवानगी फक्त सरकारी हॉस्पिटल, सरकारी आरोग्य केंद्र तसेच अधिकृत एम. डी. पॅथॉलॉजीस्ट यांना दिलेली आहे.

यापैकी कुठल्याही प्रकारात गणेश लॅब बसत नसताना सर्रासपणे कोविड-19 रॅपीड अँटीजेन टेस्ट केली जाते व रिपोर्ट तोंडी सांगितला जातो. लेखी रिपोर्टची मागणी केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. गणेश लॅबोरेटरी अधिकृत नोंदणी नसून त्यांच्या नोंदणी क्रमांकाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. लॅबचालक रिपोर्ट देताना दिशाभूल करण्यासाठी रिपोर्टच्या डाव्या कोपऱ्यात मोठ्या लॅबच्या नावाचा वापर करतात.

नियमानुसार त्या लॅबमध्ये जे सॅम्पल चेक होतात ते रिपोर्ट त्या मोठ्या लॅबच्या नावाने दिले जातात. पण येथे सर्व चाचण्यांच्या रिपोर्टवर अशा लॅबच्या नावाचा वापर केला जातो. या बाबी लक्षात घेता तसेच समोर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट असताना शहरातील अशा अनधिकृत गणेश लॅबधारकांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी परदेशी यांनी केली आहे. या तक्रारीची दखल घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.