
हिंदुस्थानी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यासाठी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने 4 डिसेंबर रोजी नौदल दिवस साजरा करण्यात आला. याच वेळी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या तब्बल 45 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा असा हा क्षण होता. मात्र पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर अवघ्या आठच दिवसांत शिवरायांचा पुतळा उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याची पडझड होऊ लागल्याचे समोर आले. असे निकृष्ट दर्जाचे काम करून मिंधे सरकारने शिवराय, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांचा अवमान केला असून असे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने आज बुधवारी संसद सभागृहात केली.
संसद अधिवेशनाच्या शून्य प्रहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या पडझडीचा मुद्दा मांडला. शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाला मानाचा मुजरा करण्यासाठी तारकर्ली किनाऱ्यावर नौदल दिवस साजरा करण्यात आला. या वेळी चित्तथरारक कसरती करून नौदलाच्या जवानांनी सर्वांची मने जिंकली. याच वेळी शिवरायांच्या 45 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी नौदल अधिकारी उपस्थित होते. अतिशय धुमधडाक्यात हा उत्सव साजरा झाला. महाराष्ट्रवासीयांची छाती अभिमानाने फुलून गेली. मात्र अनावरण झाल्यानंतर अवघ्या आठच दिवसांत हा पुतळा ज्या चबुतऱ्यावर उभारण्यात आला आहे त्या चबुतऱ्याची पडझड होऊ लागल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.
पुराव्यादाखल मांडला विषय
शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी पुरावा देत आपला मुद्दा मांडला. पडझडीची तसेच सुशोभीकरण करण्यासाठी लावण्यात आलेल्या टाईल्स कशाप्रकारे निघाल्या आहेत याची छायाचित्रेही त्यांनी संसदेत सादर केली. महाराष्ट्रवासीयांसाठी आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मिंधे सरकारने अवमान केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला. असे निकृष्ट दर्जाचे काम करून कंत्राटदाराने शिवराय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा अवमान केला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी विनायक राऊत यांनी केली.
























































