जागतिक कीर्तीचे शिल्पकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 नमिता वारणकर

मराठमोळे शिल्पकार राम सुतार. आज शिल्पकलेत जगाच्या कानाकोपऱयात त्यांचे नाव पोहोचले आहे. जगातील सर्वात उंच उभारलेला सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळाही याच हातांतून साकारला…

 लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगात सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या गुजरातमधील नर्मदा नदीकिनारी सरदार सरोवर प्रकल्पाजवळ उभारण्यात आलेल्या या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. हा भव्य पुतळा साकारण्यासाठी कराव्या लागणाऱया प्रयत्नांबाबत ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार सांगतात, जेव्हा एखादा लहान फोटो आपण मोठा करतो तेव्हा तो पिक्सलेट होतो. एवढय़ा मोठय़ा फोटोचे हावभाव कसे ठेवायचे, कपडय़ांचं काय वेगळेपण दाखवता येईल. पुतळ्याचं फोटो घेणे, तो दुरून बघणे, टेलिस्कोपी लेन्समधून तयार केलेल्या पुतळ्याचे फीचर्स तपासणे, संगणकातील आधुनिक तंत्राचा वापर करणे, त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करणे, काय करायला हवे अशा पद्धतीने अनेक बारकाव्यांचा अभ्यास करून हा पुतळा माझा पुत्र अनिल सुतार आणि मी तयार केला आहे.

आतापर्यंत पर्यटक चीन, न्यूयॉर्क, हाँगकाँगला मोठे पुतळे बघायला जायचे. आता आपल्या हिंदुस्थानातच जगातला मोठा पुतळा उभारला गेला. त्यामुळे पर्यटक हा पुतळा बघण्यासाठी उत्सुकतेने येतात. या मोठय़ा कामाद्वारे आपणही पुढे खूप मोठं काम करू शकतो ही जगासाठी आपण एक छाप सोडली आहे. शिवाय यामुळे पर्यटनात वाढ होईल. त्यामुळे हा पुतळा साकारण्याची संधी मिळाली याचा आम्हाला आनंद आहे अशी भावना ते व्यक्त करतात.

sustar-f

कलाकारही त्याच्यातली हुशारी, कल्पकतेनुसार काम करतात. ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करण्याची तयारी ठेवावी. म्हणजे फळ चांगलंच मिळतं असे त्यांना वाटते. आजच्या नव्या शिल्पकारांविषयी त्यांचे म्हणणे आहे की, आपण ध्येय काय ठेवतो आणि त्याच्यासाठी काय मेहनत घेतो हे महत्त्वाचं. कारण शिल्पकला हे खूप मेहनतीचं काम आहे. मागील साडेतीन वर्षांपूर्वीच त्यांनी हा पुतळा साकारायला सुरुवात केली. थंडी, ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता एवढय़ा उंचीवर उभं राहून काम करायचं. त्यांच्यासाठी कालावधी साडेतीन वर्षांचा मेहनतीचा होता. आता हा पुतळा बघण्यात लोकांना आनंद वाटत असला तरी यामागे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या खूप मोठय़ा तपश्चर्येचं हे फळ आहे. त्यामुळे अनुभवातही भर पडली. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढला, असे ते म्हणाले.

मूर्तीतले बारकावे दाखवण्यासाठी, उदा. कॉटनच्या कापडाचं धोतर असेल तर ते नेसल्यावर त्याची दुमड कशी असते. चुण्या कशा असतात, ते हुबेहूब आणण्याचा आपण प्रयत्न केला आहे. कुर्त्याचं कापड जाडसर कपडय़ाचं असतं. त्याच्या चुण्या आणि धोतराच्या चुण्या वेगळ्या असतात. जॅकेटचं कापड कसं दिसतं, शालीचे कोपरे कसे असतात या छोटय़ा-छोटय़ा गोष्टींचा अभ्यास करून त्या यामध्ये हाताने साकारण्यात आल्या आहेत. सध्या इंदू मिलला 250 फुटांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा पुतळा साकारण्याचं काम सुरू आहे. आजच्या तरुण शिल्पकारांनी मेहनतीची, कुठेही उभं राहून काम करण्याची तयारी, मूर्तीचे बारकावे शोधण्यासाठी करावी लागणाऱया अभ्यासाची तयारी ठेवावी. मोठं काम करण्याचं धाडस असावं. धाडस दाखवलं तर लोकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढेल. त्यांचाही आत्मविश्वास वाढून ते मोठं काम जरूर करू शकतील असा सल्ला ते नव्या शिल्पकारांना देतात.

पुतळा साकारण्याची प्रक्रिया

अवजड धातूतून प्रतिकृती तयार करणं, विशेषतः चेहऱयावरचे हावभाव वगैरे कसं शक्य होतं याविषयी राम सुतार सांगतात, आजच्या आधुनिक युगात संगणकावरील तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता असते. सुरुवातीला आम्ही 3 फुटांचा, त्यानंतर 18 फुटांचा पुतळा तयार केला. त्यानंतर 30 फुटांचा पुतळा साकारला. नंतर चेहऱयाच्या शेडिंग करून 15 फुटांचा अजून एक पुतळा तयार केला. चेहऱयावरील हावभाव, स्नायूंची रचना, चेहरा हसरा हवा, ओठांची रचना कशी हवी, डोळे, पापण्या, कानांची ठेवण, केसांची ठेवण हे सगळं कसं असायला हवी यावर बैठकीत चर्चा झाली. त्यावर बैठकीत होकार मिळाला. लोकांनी सांगितलं की, जसे आम्हाला सरदार पटेल फोटोमध्ये दिसतात, हुबेहूब तसाच पुतळा झाला आहे. त्यानंतर आम्ही 70 फुटांचा चेहरा थर्माकोलमध्ये तयार करण्याचे काम सुरू केले. एवढा मोठा चेहरा जवळून कळत नाही. त्यामुळे आम्ही 500 ते 600 फूट लांब जाऊन त्याचे फोटो काढून त्याला एनलार्ज करून बघायचो. त्याचे हावभाव बरोबर आहेत की नाही ते तपासले, हावभाव योग्य नाही वाटले तर त्याला थर्माकोल जोडून त्याला हाताने कार्व्हिंग करून त्याचे पुन्हा फोटो काढून तपासून, व्हिडीओ काढून बघून तपासून मग काम पूर्ण करायचो.

शिल्पकला म्हणजे?

शिल्पकलेविषयी त्यांचे पुत्र अनिल सुतार सांगतात, तांत्रिक ज्ञान, अभियांत्रिकी आणि कलेचं कौशल्य यांच्या मिलाफातून शिल्पकला साकारली जाते. मूर्ती तयार करण्यासाठी हातांचाच वापर योग्य आहे. कारण जे हातांनी साकारले जाऊ शकते ते मशीनने साध्य होत नाही. ज्याप्रमाणे हाताने काढलेल्या रांगोळीत जी मजा असते ती कला जाळीने काढलेल्या रांगोळीत दिसत नाही. पूर्वी संगणक नव्हता. हातानेच मूर्ती साकारली जायची. सांगाडा लाकूड किंवा लोखंडाने बनवले जायचे. आता रोबोटचा, संगणकाचा वापर करून मूर्ती साकारली जाते. सगळ्यांकडे या वस्तू असतातच असे नाही.