
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दिल्लीतील शनिधामचे संस्थापक दाती महाराज यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला. गेल्या काही महिन्यांमध्ये देशात विविध ठिकाणी बाबा लोकांचे ढोंग उघडकीस आले आहे. याच संदर्भात योगगुरू रामदेव बाबा यांनी एका न्यूज चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये रामदेव बाबा यांनी अनुल्लेखाने दाती महाराजांवर निशाणा साधला आहे.
दाती महाराजांच्या ८०० शिष्या झाल्या गायब?
‘मला आश्चर्य वाटत आहे, आजकालच्या बाबा लोकांचे ह्रदयही भरकटत आहे. योग मनातील वाईट विचारांपासून तुम्हाला दूर ठेवतो. परंतु बाबाचे ह्रदय भरकटत आहे. शनि कोणाचाच खराब नसतो’, असे योगगुरू रामदेव बाबा दाती महाराजांच्या नावाचा उल्लेख न करता म्हणाले.
कोण आहेत दाती महाराज?
दाती महाराज याचे फतेहपुर बेरी व दिल्लीत शनिधाम नावाचे आश्रम आहेत. देशभरामध्ये शनिपासून वाचण्यासाठी उपाय सांगण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. विविद टीव्ही चॅनेलवरही त्यांचे कार्यक्रम दाखवण्यात येतात. त्यामुळे महाराजाचे लाखो समर्थक आहेत.
कोणी केला बलात्काराचा आरोप?
दाती महिराजांवर त्यांच्या महिला शिष्याने बलात्काराचा आरोप केला आहे. दोन वर्षांपूर्वी महाराजांनी शनिधाममध्ये आपल्यावर लैंगिक अत्याचार केला. पण याबद्दल कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी महाराजने दिली होती. यामुळे मी गप्प होते, असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर दाती महाराजांवर कलम ३७६, ३७७, ३५४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दाती महाराजांचे स्पष्टीकरण
महिलेच्या आरोपानंतर दाती महाराजांनी स्पष्टीकरण देताना आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. मला फसवण्यात येत आहे. मी एकवेळ फाशी चढेल परंतु महिलांचा अपमान करणार नाही, असे दाती महाराज म्हणाले.




























































