दाती महाराजांच्या ८०० शिष्या झाल्या गायब?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोप झालेले दाती महाराज यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्या पाली येथील आश्रमातून तब्बल ८०० शिष्या गायब झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या शिष्या नेमक्या कुठे गेल्या आणि त्यांच्यासोबतही अशाच काही प्रकारची दुष्कृत्य झालेली नाहीत ना, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

महिलेने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यामुळे दाती महाराज यांच्या छतरपूरसह राजस्थान येथील पाली आणि नेपाळ येथी आश्रमांवर छापे टाकले. गुरुवारी जेव्हा पोलिसांची पथकं पाली येथील आश्रमावर पोहोचली, तेव्हा तिथे असलेल्या २७ खोल्या रिकामी असल्याचं त्यांना आढळलं. आश्रमात फक्त पाच जण उपस्थित होते आणि एक सुरक्षा रक्षक होता. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आश्रमात ८०० शिष्या तिथे राहत असल्याचं कबूल केलं. पण, धाड टाकण्याच्याच दिवशी त्या सगळ्या जणी गायब झाल्या. त्या कुठे गेल्या याचा शोध सुरू करण्यात आला आहे. या आश्रमातून काही दस्तऐवजही हाती लागले असून ती या शिष्यांची शपथपत्रं असल्याचं समोर येत आहे. या शिष्यांना आश्रमात दीक्षा घेण्यापूर्वी शपथपत्रं लिहून द्यावी लागत असत.

ज्या महिलेने दाती महाराजांवर आरोप केला आहे, तिने दिलेल्या माहितीची शहानिशा करण्यात आली आहे. त्यानुसार, महिलेने जी माहिती दिली आहे, त्या माहितीची पडताळणी करण्यात आली. सद्यस्थितीत त्या पडताळणीत महिला खरं बोलत असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे दाती महाराजांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यातच ८०० शिष्यांच्या गायब होण्यामुळे या प्रकरणातलं रहस्य आणखी गडद झालं आहे.