मुद्दा – आयुष्याचा जोडीदार निवडताना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेम हे असे आहे की, ते कुणावर होईल आणि कधी होईल हे काही सांगता येत नाही. एखाद्या दिवशी अशी एक घटना घडून जाते आणि आपण नकळत कधी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो हे आपल्यालाही कळत नाही.

रात्री झोपताना, सकाळी उठताना किंवा काम करत असताना सतत त्याच व्यक्तीबद्दल आपण विचार करत असतो. म्हणजे त्या व्यक्तीमध्ये  इतरांपेक्षा आपण काही वेगळेच पाहिलेले असते. म्हणून त्या व्यक्तीबद्दल आपण सतत विचार करत असतो.

कुणी सौंदर्यावर प्रेम करतं तर कुणी त्या व्यक्तीच्या विचारांवर प्रभावित होऊन प्रेमात पडतो, पण सौंदर्य पाहून प्रेम करतात. मग त्यांचे विचार एकमेकांशी जुळत आहेत की नाही ते पाहत नाहीत. थोडे दिवस व्यवस्थित चालत असते त्यांचे, पण एकमेकांचे विचार काही पटत नाहीत आणि मग भांडण व्हायला सुरुवात होते. मग होतात ब्रेकअप किंवा लग्न झाले असेल तर विभक्त होतात. असे चित्र आपल्याला खूप पाहायला मिळते. टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रामध्ये पण या अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. मग प्रेम करताना प्रेमातून जात असताना आणि या प्रेमाच्या नात्याला पुढचे नाव देताना थोडा विचार करायला हवा की, आपण ज्या मुलीवर किंवा मुलावर प्रेम करत आहोत आणि पुढे लग्न करणार आहोत तो मुलगा दिसायला तर सुंदर आहेच, पण त्याचे विचार आपल्याशी किती जुळतात हे नक्की पाहायला हवे. फक्त नोकरी पाहून किंवा सौंदर्य पाहून निर्णय घेतला तर ते नाते जास्त दिवस टिकत नाही. कारण आपल्याला हवा असलेला जोडीदार आपल्याला पाहिजे तसा मिळतोच असे नाही. नोकरी, पैसा हे सर्व त्याच्याकडे असतं, पण पुढे आपल्याला कळतं की, आपले विचार आणि त्याचे विचार खूप वेगवेगळे आहेत. त्यामुळे जीवनात खटके उडतात आणि याचे परिणाम पुढे वाईट होतात. म्हणून आपण ज्याच्यासोबत सात जन्मांच्या बंधनात बांधले जाणार आहोत, ‘तो’ किंवा ‘ती’ आपल्याला किती समजून घेते हा विचार करणे गरजेचे आहे.

कधी कधी मुलगी जास्त पगार कमावते, तर तिच्यापेक्षा मुलगा हा खूपच कमी पगारावर काम करतो. तरीसुद्धा ते आनंदात असतात. कारण ते एकमेकांना समजून घेतात आणि ते एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. म्हणून त्यांच्या वैवाहिक जीवनात ते खूप आनंदात असतात. याउलट दोन्ही, नवरा-बायको खूप मोठय़ा पगारावर काम करतात, पण त्यांचे मन एकमेकांशी जुळलेले नसते. म्हणून त्यांची एकदम छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून भांडणे होतात आणि काही वेळा तर असे लोक एकमेकांपासून विभक्तसुद्धा होतात. कारण त्यांनी फक्त नोकरी आणि रंग, रुबाब पाहून लग्न केलेले असते किंवा प्रेमात असतात म्हणून अशी वेळ त्यांच्यावर आलेली असते. म्हणून प्रेमात आणि आपण ज्याच्या सोबत लग्न करणार आहोत त्याचे विचार कसे आहेत ते अगोदर ओळखून घ्यायला पाहिजे. आपण लग्न करतोय किंवा ज्या मुलावर आपण प्रेम करतोय त्याला तुमच्यापेक्षा कमी पगार असला म्हणून काय झालं, पण तो आपल्याला किती समजून घेतोय व आपल्यावर किती प्रेम करतो आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. आपला नवरा कमी पगार कमवत असला तरी आपल्यावर खूप प्रेम करतो आणि आपल्याला खूप समजून घेतो हे काय आयुष्यात कमी आहे का?

म्हणून प्रेमात पैसा, सौंदर्य, रंग, रुबाब या गोष्टी जास्त महत्त्वाच्या नाहीत, तर त्या मुलाचे व मुलीचे विचार जास्त महत्त्वाचे असतात. आपण ज्या व्यक्तीसोबत आहोत त्याचा पगार कमी असेल, पण त्याचे विचार जास्त श्रेष्ठ असतील तर तिथे आपले आयुष्य नक्कीच चांगले जाईल एवढे मात्र नक्की.

आधुनिक जग वेगाने पुढे सरकते आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि नवनवीन अभ्यासक्रम येत आहेत. युवा पिढी त्याकडे आकर्षित होत आहे. आज अनेक अशी दांपत्ये आहेत, जी सुखाने नांदतात आणि फावल्या वेळात समाजकार्यही करतात. अनेक युवा-युवती गरीब लोकांच्या वस्तीत जाऊन सेवा देतात. जे कुटुंब वैद्यकीय क्षेत्रात आहे, ते आठवडय़ातून सुटीच्या दिवशी वाडय़ावस्त्यांवर जाऊन शिबिरे लावतात आणि रुग्णांवर मोफत उपचार करतात. लग्न, कुटुंब म्हणजे केवळ ‘मी आणि माझा संसार’ या परिघातून आता युवाशक्ती बाहेर पडत आहे. हे एक शुभचिन्ह आहे. ही संख्या कमी असली तरी ती वाढण्यासाठी अन्य सुखी कुटुंबांनीही आपला हातभार लावला पाहिजे. दोघांचेही विचार समाजाभिमुख असतील तर समाजाचेही कल्याण होऊ शकते.

>> रामकृष्ण पांडुरंग पाटील ([email protected])