वेदान्त माधवनचे सुवर्ण‘पंच’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेते आर. माधवन यांचा मुलगा वेदान्तने मलेशियन इन्व्हिटेशन एज ग्रुप चॅम्पियनशिपमध्ये 5 सुवर्णपदके जिंकून हिंदुस्थानचा तिरंगा अभिमानाने फडकवला. त्याने 50 मीटर, 100 मी, 200 मी., 400 मी. आणि 1500 मीटर स्पर्धेत सुवर्णपदकांची लयलूट केली. आर. माधवन यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. ‘देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्व शुभेच्छांनी वेदान्तने क्वालालंपूर येथे या शनिवार व रविवारी आयोजित मलेशियन इन्व्हिटेशन एज ग्रुप चॅम्पियनशिपमध्ये 5 सुवर्णपदके जिंकली.

राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असलेल्या वेदान्तच्या या कामगिरीवर सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. चाहत्यांसह राजकीय नेतेमंडळीही वेदान्तचे कौतुक करताना दिसत आहेत. वेदान्तने देशासाठी पदके जिंकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गतवर्षीही त्याने 48व्या ज्युनियर नॅशनल जलतरण चॅम्पियनशिपमध्ये फ्रिस्टाईल नॅशनल ज्युनिअर रेकॉर्ड मोडला होता. तसेच अनेक देशांमध्ये आयोजित स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदकासह इतर पदकेही जिंकली आहेत.