शिर्डीत रंगपंचमी उत्साहात साजरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साईबाबांच्या शिर्डीत रंगपंचमीचा उत्साह दिसून आला आहे. कोरोना व्हायरसचे सावट असतानाही शिर्डीत रंगपंचमी खेळण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी साईबाबांची रथ मिरवणुक सुरू होताच भाविकांनी साईनामाचा जयघोष करत रंगाची मुक्त उधळण करत रंगपंचमीचा मनसोक्त आनंद घेतला. भाविक , ग्रामस्थ , सेवेकरी , मानकरी तसेच पुजारीही रंगात न्हाऊन निघाले होते. देशभरातून अनेक भाविक दरवर्षी शिर्डीत रमगपंचमी साजरी करण्यासाठी येतात. यावेळी कोरोनाच्या भीतीमुळे संख्या कमी असली तरी उत्साह कायम होता.

साईबाबांची प्रतिमा, पादुका यांची रथातून वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. साई मंदिरातून द्वारकामाई मंदीर आणि शहरातून निघालेल्या रथ मिरवणुकीदरम्यान अनेक भाविकांनी रथाचे दर्शन घेतले. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई साईबाबांची मूर्ती आणि समाधीही विविध रंगाने रंगली होती. दरवर्षी शिर्डीत रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. हजारो भाविक या रंगोत्सवात सहभागी होतात. साईबाबांच्या हयातीतच शिर्डीत रंगपंचमी साजरी केली जात होती. तीच परंपरा आजही साईमंदिरात सुरू आहे.