बलात्काराच्या आरोपींना नाही मिळणार सरकारी सुविधा, ‘या’ राज्याचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चंदीगड

बलात्कार, विनयभंगाच्या आरोपींना आता सरकारी सुविधांना मुकावे लागणार आहे, असा निर्णय हरियाणा सरकार लवकरच घेणार आहे, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी तशी घोषणाही केली आहे. एका सामान्य नागरिकाला ज्या ज्या सरकारी सुविधा मिळतात त्या सुविधा आता आरोपींना मिळणार नाही. त्यामध्ये वृद्ध, अपंग व्यक्तींना मिळणारी पेंशन, शस्त्र बाळगण्याचा परवाना तसेच वाहन चालवण्याचा परवानाही त्यांना मिळणार नसल्याची तरतूद या कायद्यात करण्यात येणार आहे.

पंचकुला येथे महिला सशक्तीकरणाच्या कार्यक्रमात खट्टर यांनी याबद्दल माहिती देताना म्हणाले की ‘‘दररोज महिलांवर होणारे बलात्कार व अत्याचारांमुळे देश हादरत आहे. अशा नरधामांना या कायद्यामुळे जरब बसेल म्हणून हरियाणा सरकारने हे पाऊल उचलले आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार एक व्यापक योजना आणणार असून त्याची अंमलबजावणीची सुरूवात स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन अथवा प्रजासत्ताक दिन पैकी एका दिवशी केली जाईल” असेही ते यावेळी म्हणाले. बलात्कार व विनयभंगाच्या आरोपींना सरकारी सुविधांपासून वंचित ठेवण्यात येणार असून त्यांना फक्त स्वस्त धान्य ही सुविधा उपलब्ध असेल असे खट्टर यांनी स्पष्ट केले.